पुणे, दि.१० डिसेंबर :” भारतीय तत्वज्ञान हे जगातील सर्वश्रेष्ठ आहे. संपूर्ण मानवजातीचे कल्याण साधण्यासाठी ज्ञानेश्वरीला आपल्या जीवनात उतरावे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातूनच विश्वशांती निर्माण करता येईल.”असे विचार हभप सद्गुरू शिवलाल महाराज यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी हभप सद्गुरू महाराज शिवलाल महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायासाठी समर्पित केले आहे. ते आज १०१ वर्षांचे आहे. त्यानिमित्ताने त्यांचा ‘समर्पित जीवन गौरव पुरस्काने’ सन्मान करण्यात आला. माजी खासदार श्रीनिवास पाटील व विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देण्यात आले.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी हशप बापूसाहेब मोरे देहूकर, तुळीराम दा. कराड, उषा विश्वनाथ कराड, पं.वसन्तराव गाडगीळ, डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. एस.एन.पठाण, डॉ. मिलिंद पांडे, योगगुरू मारूती पाडेकर गुरूजी, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर व विष्णू भिसे उपस्थित होते.
हभप सद्गुरू महाराज शिवलाल महाराज म्हणाले,” वारकरी हा चिंतन भजन करणारे असतात. त्यामुळे त्यांनी कधीही व्यसनाच्या आहारी जाऊ नये, कोणावर ही अत्यचार करू नये आणि सतत आपल्यातील दोष दूर करण्याचा प्रयत्न करत राहावा. रामकृष्ण हरी या नावात अनंत शक्ती आहे. त्यामुळे हे नाव सतत मुखात असावे. भक्तीच्या मार्गावर चालतांना सतत संतुष्ट रहावे. ईश्वराने आम्हाला समाजसेवेसाठी निवडले आहे हे सतत ध्यानात ठेवावे.”
श्रीनिवास पाटील म्हणाले, “ज्ञानेश्वरांनी आम्हाला घडवल आहे. त्यांच्या नामस्मरणात अफाट शक्ती आहे. आज डॉ. कराड यांनी इंद्रायणीच्या नदीवर जो कायापालट केला आहे ते माऊलीच्या आशीर्वादानेच. यापुढे ही त्यांच्याय मार्गदर्शनात या घाटवर अनेक चांगल्या गोष्टी उदयाय येईल. ”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, १९८७ साली घाटाच्या कामाची सुरूवात झाली. या घाटामुळे वारकर्यांसाठी योग्य सुविधा निर्माण झाल्या आहेत. विनम्रता, श्रध्दा, भक्ती आणि कर्मयोगामुळे आज हे सर्व काही घडले आहे. संपूर्ण जगात ज्ञानेश्वरी पोहचविण्याच्या दिशेने सर्वांना कार्य करावयाचे आहे.
यावेळी सामाजिक सलोखा या विषयावर संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रफीक सय्यद यांनी प्रवचन केले. त्यांनी अनेक उदाहरणाच्या माध्यमातून हिंदू मुस्लीम एक असल्याचे सांगितले. भक्ती मार्गावर चालल्याने सामाजिक सलोखा वृध्दिगत होतो. वारीमध्ये सुद्धा कित्येक मुस्लिम बांधव वारी करतात आणि पांडूरंगाच्या चरणी लीन होतात. आज समाजात सलोख्याचे वातावरण जपूण ते पुढील पिढी पर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
त्यानंतर पं. वसंन्तराव गाडगीळ यांनी विचार व्यक्त केले.
नंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.
भारतीय तत्वज्ञान जगातील सर्वश्रेष्ठ जागतिक सहिष्णुता सप्ताहात समर्पित जीवन गौरव पुरस्कारने सन्मानीत केल्यानंतर हभप सद्गुरू शिवलाल महाराज यांचे विचार
Share with
Tagged in :