Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे युवकांना आवाहन*

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे युवकांना आवाहन*

 

 

पुणे, दि. २२ : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांना नोकरी मिळण्यासाठी तसेच त्यांच्यात रोजगारक्षमता वाढविण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ या महत्वकांक्षी योजनेची घोषणा केली असून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.

 

या योजनेअंतर्गत रोजगार इच्छुक उमेदवार व रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक, आस्थापना जोडले जाणार आहेत. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून (आंतरवासिता) मिळून त्यांची क्षमतावाढ होण्यास मदत होईल. याचबरोबर उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे (आंतरवासिता) उपलब्ध करून देण्यात येईल.

 

विविध क्षेत्रातील उद्योग, स्टार्टअप, विविध आस्थापना इत्यादींना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन पध्दतीने नोंदवतील तसेच बारावी, आय.टी.आय, पदविका, पदवी व पदव्युतर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार देखील https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतील. खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणसाठी घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय आस्थापना, उद्योग तसेच महामंडळामघ्ये मंजूर पदाच्या ५ टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा (आंतरवासिता) कालावधी हा ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना विद्यावेतन हे शा़सनामार्फत थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. उमेदवारांना देण्यात येणारे विद्यावेतन हे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे असेल. १२ वी पास उमेदवारांना प्रतिमाह ६ हजार रूपये, आयटीआय, पदविका उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमाह ८ हजार रूपये तर पदवीधर व पदव्युतर पास उमेदवारांना प्रतिमाह १० हजार रूपये इतके विद्यावेतन देण्यात येईल.

 

योजनेच्या लाभासाठी पात्रता-उमेदवारांचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे. शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युतर असावी. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा. उमेदवाराचे आधार नोंदणी असावी व उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

 

आस्थापना व उद्योजकासाठी पात्रता-आस्थापना व उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. आस्थापना व उद्योगाने या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. आस्थापना, उद्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी. आस्थापना, उद्योगांनी ईपीएफ, इएसआयसी, वस्तु व सेवा कर, निगमन प्रमाणपत्र, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी.

 

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार, आस्थापना व उद्योजकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,४८१ रास्ता पेठ पुणे या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments