विवेक वेलणकरांनी हसतखेळत, चिमटे काढत विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
पुणे : चित्रकला, जर्मन भाषा या विषयांची भविष्यात असणारी उपयुक्तता स्पष्ट करत, सरावाचं आपल्या शालेय जीवनात काय महत्त्व आहे, सराव कसा करावा, अभ्यास कसा लक्षात ठेवावा आदी विषयांवर सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना हसतखेळत, चिमटे काढत उत्तम मार्गदर्शन केले.
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर धनकवडीतील‘सदैव’ फाउंडेशन संस्थेने त्यांच्या शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून
नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या धनकवडी येथील श्री वामनराव ओतुरकर माध्यमिक विद्यालयात सोलर पॅनल प्रकल्प राबवला. त्या प्रकल्पाचा लोकार्पण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन केले. हा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेऊन विशेष कार्यरत असणारा सदैव फाउंडेशनचा कार्यकर्ता शिवानंद गंजी याचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या वाचनालयाला सदैव फाउंडेशनतर्फे पुस्तके भेट देण्यात आली.
विद्यालयात राबविण्यात आलेल्या सोलर पॅनल प्रकल्पाचा खर्च सुमारे अडीच लाख रुपये असून त्याची क्षमता ३ किलो वॅट आहे. शाळेतील दोन मजले यां सिस्टिममुळे प्रकाशीत होत असून त्यामुळे विद्यालयाचा विज बिलाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
कार्यक्रमाला स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक विशाल तांबे, नगरसेवक किशोर धनकवडे, नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम गाढवे, नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव गायकर सर, रोटरी क्लबचे नितीन खिरीड, सदैव फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत पवार, ओतूरकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बोरसे सर यांच्यासह विध्यार्थी, शिक्षक, पालक, सदैव फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नगरसेवक विशाल तांबे यांनी सदैव फाउंडेशनच्या कामांचे, सोलर पॅनल प्रकल्पाचे कौतुक केले. तसेच शाळेत राबविल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांचे कौतुक केले. अभिजीत पवार यांनी फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती दिली आणि भविष्यातील कामांची कल्पना दिली. नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम गाढवे आणि शाळेचे मुख्याध्यापक बोरसे सर यांनी सदैव फाउंडेशनचे आभार मानले आणि शाळेच्या प्रगतीचा आढावा दिला.
नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे श्री वामनराव ओतुरकर विद्यालय गेली ३५-४० वर्षं धनकवडी भागात कार्यरत आहे आणि ह्याच शाळेत परिसरातील अनेक गरजवंत विद्यार्थी शुल्क कमी असल्यामुळे शिक्षण घेऊ शकतात. म्हणून ‘सदैव’ फाउंडेशन’ने या विद्यालयाला सर्वतोपरी मदत करण्याचे ठरवले.
सदैव फाउंडेशन नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असते. समाजातील अनेक घटकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य पद्धतीने मदत करण्यात त्यांचा पुढाकार असतो.
सूत्रसंचालन शिक्षिका प्रज्ञा खरात यांनी केले.
चौकट
खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्या शुभेच्छा
विद्यालयातील सोलर पॅनल प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमाचे उदघाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार होते. परंतु पुण्यात गेले काही दिवस पडत असलेल्या पाऊसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्याचे काम प्राधान्याने करायचे असल्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत; मात्र त्यांनी आवर्जून शाळेला आणि सदैव फाऊंडेशनला शुभेच्छा दिल्या आणि काही दिवसांतच या प्रकल्पाच्या पाहणीसाठी शाळेला भेट देण्याचे आश्वासन दिले.


