Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedगव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलमुळे (GeM) शासकीय खरेदी प्रक्रिया पारदर्शक अन् गतिमान*  ...

गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलमुळे (GeM) शासकीय खरेदी प्रक्रिया पारदर्शक अन् गतिमान*      *- उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ*

 

 

*ठाणे, दि.5 (जिमाका) :-* शासकीय कार्यालयांना लागणारे साहित्य व सेवा घेण्यासाठी केंद्र शासनाने शासकीय ई-बाजार अर्थात गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (Gem) पोर्टल विकसित केले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचा मोठा सहभाग आहे. या पोर्टलमुळे खरेदी प्रक्रिया गतिमान व पारदर्शक झाली असून शासकीय कार्यालयांना दर्जेदार साहित्य उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ यांनी आज येथे केले.

केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (Gem) पोर्टलचा अधिकाधिक वापर करून शासकीय कार्यालयांनी वस्तू व सेवांची खरेदी करण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे यांच्यातर्फे आज शासकीय कार्यालयांचे कार्यालयप्रमुख व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक संध्या साळुंखे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री.एस.बी.गायकवाड, श्री. डोईफोडे उद्योग अधिकारी श्रीमती अश्विनी कोकाटे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी भरत साळुंके, GeM पोर्टल प्रशिक्षक श्री.शैलेश जाधव, मालविका रघुनाथ या मान्यवरांसह शासकीय, निमशासकीय तसेच स्वायत्त संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सहसंचालक श्रीमती शिरसाठ म्हणाल्या की, शासकीय खरेदी धोरणानुसार शासकीय कार्यालयांना खरेदी करणे आता जेम पोर्टलमुळे सोपे झाले आहे. तसेच जेम पोर्टलवर पारदर्शकतेमुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी हे तणावातून मुक्त झाले असून मानसिक शांती मिळाली आहे. या पोर्टलमुळे “मेक इन इंडिया” धोरणालाही मोठे योगदान प्राप्त झाले आहे. शासकीय कार्यालयांना लागणारे साहित्य जेम पोर्टलवरून खरेदी होत असल्याने कामकाजात गतिमानता प्राप्त झाली असून परवडणाऱ्या दरात दर्जेदार साहित्य मिळत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांनी जेम पोर्टलचा वापर करून खरेदी प्रक्रिया राबवावी. ज्यांनी अद्याप जेम पोर्टलवर नोंदणी केली नाही, त्या कार्यालयांनी तात्काळ नोंदणी करावी.

जेम पोर्टलवरील खरेदीमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात अव्वल स्थानावर आहे. जेम पोर्टलचा प्रभावी वापर केल्याबद्दल राज्याला पुरस्कारही मिळाले आहेत. या पोर्टलवरील खरेदी प्रक्रिया सुटसुटीत असून शासकीय कार्यालयांना फायदेशीर आहे. तसेच या पोर्टलमध्ये एमएसएमई, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उद्योजकांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांना आता जेम पोर्टलवरूनच खरेदी करण्याचे बंधन घालण्यात येणार आहे. जास्तीत जास्त कार्यालयांनी जेम पोर्टलवरून खरेदीसाठी पुढाकार घ्यावा,असेही त्या म्हणाल्या.

जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती सोनाली देवरे यांनी आपल्या प्रस्तावनेत राज्य शासनाचे खरेदी धोरण, धोरणातील तरतुदी, खरेदी करताना अवलंबविण्याची प्रक्रिया,जेम पोर्टलचा फायदा याविषयीची माहिती दिली. या पोर्टलचा जास्तीत जास्त वापर व्हावा,यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे. जेम पोर्टलसंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र संपूर्ण सहकार्य करणार आहे.

यावेळी केंद्र शासनाच्या जेम पोर्टलसंबंधीचे ठाणे जिल्ह्याचे नोडल अधिकारी शैलेश जाधव व त्यांच्या सहकारी मालविका रघुनाथ यांनी जेम पोर्टलवरील नोंदणी, खरेदी प्रक्रिया, ई-निविदा यासंदर्भात सविस्तर सादरीकरण केले. तसेच त्यांनी जेम पोर्टल विषयी उपस्थितांच्या विविध शंकांचेही निरसन केले.

या कार्यशाळेनिमित्त जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी व जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनीही या कार्यशाळेचे महत्व, जेम पोर्टलची शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेली उपयुक्तता, जेम पोर्टल वापरण्याविषयीचे अनुभव आपल्या मनोगतातून अधोरेखित केले. तसेच जिल्हा कौशल्य विभागाच्या सहाय्यक संचालक संध्या साळुंखे यांनी यावेळी “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण” कार्यक्रमाविषयीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

कार्यशाळेच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन संपन्न झाले. महाव्यवस्थापक सोनाली देवरे व उद्योग अधिकारी श्री. गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देवून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उद्योग अधिकारी अश्विनी कोकाटे यांनी केले.

००००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments