▪️पुणे -सांस्कृतिक वार्तापत्राच्या ‘मातृप्रेरणा’ विशेषांकाचे मंगळवारी १३४ ऑगस्ट रोजी प्रकाशन होणार आहे. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात आयोजित कार्यक्रमात राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन होईल.
▪️सांस्कृतिक वार्तापत्राच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एका विशेष विषयावर अंकाचे प्रकाशन केले जाते. यावर्षी मातृप्रेरणा विशेषांकाचे श्री.मा.स.गोळवलकर गुरूजी विद्यालयाच्या गणेश हॉलमध्ये १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत अंकाचे प्रकाशन होणार आहे. प्रसिद्ध लेखिका विनिता तेलंग या अंकाच्या अतिथी संपादक आहेत.
▪️या वेळी संस्कृती जागरण मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग गोडबोले, लेखिका शेफाली वैद्य उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या विदुषींनी आपल्या यशामागील आईची प्रेरणा या अंकात शब्दांकीत केली आहे. जागतिक कीर्तीच्या नेमबाज तेजस्विनी सावंत, चित्रपट अभिनेत्या मृणाल देव-कुलकर्णी, मणिपुरी नृत्यांगना उर्मिका मायबाम, लेखिका निशिगंधा वाड आणि राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ प्रचारिका चंदाताई साठे यांची मातृप्रेरणा या अंकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
▪️छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीला ३५० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने सांस्कृतिक वार्तापत्राने ज्या माता आपल्या पाल्यासाठी; त्यांच्या यशासाठी प्रेरणा ठरल्या, अशा मातांचा प्रातिनिधिक सन्मान करायचे ठरविले. या अंकात विविध क्षेत्रातल्या यशस्वी व्यक्तींनी आपल्या मातेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. अवघ्या हिंदू समाजाला प्रेरणा दिली अशा राजमाता जिजाबाई,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांना घडविणाऱ्या जमनाबाई गायकवाड, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील अनेक मुलींच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या बाया कर्वे यांच्या विषयी लेख आहेत. तसेच अभिनय क्षेत्रातील मृणाल कुलकर्णी,निशिगंधा वाड यांनी आपल्या जडणघडणीत आईची प्रेरणा याबद्दल लिहिले आहे. प्रचारक माता, वर्दीतील माता, युद्धभूमीवरील माता, समाजसुधारक माता अशा विविध मातांचा आणि त्यांच्या प्रेरणेचा या अंकाचा समावेश आहे.याशिवाय आजच्या मातृत्वासमोरील आव्हाने देखील यात वाचायला मिळतील. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे ,असे आवाहन सांस्कृतिक वार्तापत्राच्या वतीने करण्यात आले आहे.


