पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे साउथ , बीजे वैद्यकीय महाविद्यालय, ससून सर्वोपचार रुग्णालय आणि अखिल मंडई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी स्तन कर्करोग पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १५० पेक्षा अधिक महिलांची तपासणी करण्यात आली.
अखिल मंडई मंडळाच्या तात्यासाहेब थोरात समाज मंदिरात तपासणी शिबिर झाले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, रोटरी क्लब ऑफ पुणे साउथ चे अध्यक्ष डॉ.मंदार अंबिके, चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे, ससूनच्या शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख लता भोईर, हेमंत वाळिंबे, सुरज थोरात, आय ब्रेस्टच्या गंधाली देसाई यावेळी उपस्थित होत्या.
अण्णा थोरात म्हणाले, मंडईतील भाजी विक्रेत्या महिला, कष्टकरी महिला या महिला आवर्जून तपासणीसाठी जात नाहीत. त्यामुळे सहयोगी संस्थांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांमधून त्यांची तपासणी मोफत केली जाते आणि आवश्यकता असल्यास उपचार देखील दिले जातात. दुर्लक्ष केल्यामुळे महिलांमधील स्तन कर्करोगांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. मागील वर्षी केलेल्या शिबिरात तीन महिलांना कर्करोग निदान होऊन त्यांच्यावर वेळेत उपचार देखील झाले.


