समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात.
राज्य शिक्षक पुरस्कार योजना 1962-63 पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन 2021-22 पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून हा पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येत आहेत. दिनांक 13 जून 2011 च्या शासन निर्णयान्वये पुरस्काराची रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) अदा करण्यात येते. तसेच राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक 4 सप्टेंबर 2014 च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) अदा करण्यात येते.
सन 2023-24 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने दिनांक 30 ऑगस्ट 2024 च्या पत्रान्वये शिक्षकांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवड यादी शासनास सादर केली. त्यानुसार शासनाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि.2 सप्टेंबर 2024 च्या पीटीसी-2024/प्र.क्र.47/टीएनटी-4 या शासन निर्णयान्वये घोषित केले आहेत.
सन 2023-24 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय 109+1* शिक्षकांची निवड केली आहे.
• प्राथमिक- 38 + 1* (*-वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक प्रवर्गातील (1) न्यायालयाच्या आदेशानुसार विचारात घेण्यात आलेला पुरस्कार सन (2022-23))
• माध्यमिक -39
• आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षण (प्राथमिक)-19
• थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार-8
• विशेष शिक्षक कला/क्रीडा (1+1)-2
• दिव्यांग शिक्षक/दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक-1
• स्काऊट / गाईड (1+1)-2
• एकूण पुरस्कार संख्या- 109+1* (*-वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक प्रवर्गातील (1) न्यायालयाच्या आदेशानुसार विचारात घेण्यात आलेला पुरस्कार सन (2022-23))
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातील 1) लक्ष्मण महादेव घागस, सहायक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, तोंडली केंद्र, शिरवली, ता.मुरबाड, 2) मनोज महाजन, सहायक शिक्षक, आयईएस नवी मुंबई हायस्कूल, जि.ठाणे 3) सुधीर पुंडलिक भोईर, सहायक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, रातांधळे, मु.पो.रातांधळे, ता.शहापूर या शिक्षकांची निवड जाहीर करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम दि.5 सप्टेंबर 2024 या शिक्षक दिनी मुंबई येथे होणार आहे.
याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक 202409021748180321 हा आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे जिल्हा प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
मनोज सुमन शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी
ठाणे
0000000


