*
पुणे, दि. ३१ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर दिव्यांग,ज्येष्ठ नागरिक तसेच इतर मतदारांना आवश्यकतेनुसार सहाय्य करण्यासाठी ३२५ स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी कळविली आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या कामकाजाकरता लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम २६ नुसार स्वयंसेवकांनी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक राहील. स्वयंसेवकांनी आजारी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे, दिव्यांगांना लागणारे साहित्य पुरविण्यासाठी मदत करणे, उन्हामुळे मतदारांना काही त्रास उद्भवल्यास त्यांना पाण्याची सोय उपलब्ध करून देणे, आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित मदत मिळवून देणे, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांचे मतदान प्रक्रिया झाल्यानंतर गेटपर्यंत सोडवण्याची व्यवस्था करणे तसेच आजारी व्यक्तींना रॅम्प वरून घेऊन जाताना विशेष काळजी घ्यावी,अशा सूचना श्री लबडे यांनी दिल्या आहेत.
000


