२० नोव्हेंबर रोजी येणा-या विधानसभा निवडणूकीकरीता सर्व कर्मचा-यांनी न विसरता मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत व सक्षम करण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन गरवारे उद्योग समूहाच्या गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे मुख्य प्रशासक संदीप निकम यांनी केले.
२०६, पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कार्यक्षेत्रात व्यापक प्रमाणात मतदान जनजागृती करण्यात येत आहे, त्याअनुषंगाने गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमात कर्मचा-यांना मतदानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थित कर्मचा-यांनी “ आम्ही भारतीय नागरीक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु” अशी शपथ घेऊन मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमास स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, गरवारे फायबर्स कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख रवेंद्र मिश्रा, डी.व्ही.कुलकर्णी, प्लांट इन्चार्ज प्रशांत बोडके, कामगार संघटनेचे अध्यक्ष जयवंत खाटपे, सरचिटणीस सुधीर चिंचवडे, स्वीप विभागाचे संदीप सोनवणे, महालिंग मुळे, दिनेश जगताप तसेच कंपनीमधील कर्मचारी उपस्थित होते.
गरवारे उद्योग समूहाच्या भारतात विविध कंपन्या असून प्रत्येक निवडणूकीत या कंपनीचे कामगार मतदान करण्यासाठी अग्रेसर असतात असे मनुष्यबळ विभागप्रमुख रवेद्र मिश्रा यांनी सांगितले.
स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थितांना मतदान करण्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे सांगून या सुट्टीचा प्रथम मतदानासाठी वापर करावा असे सांगितले तसेच मतदार नोंदणी ते प्रत्यक्ष मतदान या संपूर्ण प्रक्रियेची माहिती सांगितली, कार्यक्रमानंतर कर्मचा-यांना मतदार मार्गदर्शिकेचे वाटप करण्यात आले.


