पुणे : कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती (जमाष्टमी) निमित्त श्री भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरामध्ये दिनांक १२ ते २१ नोव्हेंबर दरम्यान दररोज दुपारी ४.३० ते सायंकाळी ७.३० यावेळेत कथा होणार असून कथाकार आनंद जोशी हे निरुपण करणार आहेत.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत आहे. भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.
उत्सवांतर्गत शुक्रवार, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते १२ यावेळेत रुद्रयाग महायज्ञ होणार आहे. तसेच, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पं. आनंद भीमसेन जोशी यांचा संतवाणी हा सुश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा व विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.


