पुणे : लघुरुद्र व महापूजा, अष्टोत्तरी शतनामावली पूजा, आरती यांसह मुख्य जन्मसोहळा कसबा पेठेतील श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ येथे थाटात साजरा झाला. रुद्रयाग महायज्ञासह विविध धार्मिक विधी मंदिरात पार पडले. उत्सवानिमित्त विद्युतरोषणाई, फुलांची आरास व पणत्यांच्या प्रकाशात मंदिर सजविण्यात आले.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सवाला कथाकार आनंद जोशी यांच्या श्री भागवत कथा सप्ताहाने प्रारंभ झाला होता.
कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात जन्मसोहळा पार पडला. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.


