पिंपरी, दि. ३ डिसेंबर २०२४ – दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नेहमीच विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात. १७ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान दिव्यांग बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी “पर्पल जल्लोष” म्हणजेच ‘जल्लोष दिव्यांगत्वाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमात शहरातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी उपस्थित दिव्यांग बांधवांशी संवाद साधताना आयुक्त सिंह बोलत होते. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, प्रशासन अधिकारी सुचेता पानसरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, दत्ता भोसले, राजेंद्र वाघचौरे, संगीता जोशी, परशुराम बसवा, जनार्दन कोळसे, शंकर सोळसे तसेच विविध दिव्यांग व सामजिक संघटनांचे प्रतिनिधी, दिव्यांग बांधव आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेचे दिव्यांग भवन हे दिव्यांग बांधवांना स्वत:ची हक्काची जागा वाटावी यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. दिव्यांग भवनामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करून अधिक दर्जेदार सुविधा पुरविण्यावर महापालिका भर देत आहे. सहा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांचे अंपगत्व ओळखून त्यावर तज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार करण्याची आवश्यकता आहे. सुरूवातीलाच दिव्यांगत्वाचे निदान झाल्यास योग्य उपचार करण्यास आणि कमी वेळेत दिव्यांगत्वावर मात करण्यास मदत होऊ शकते. दिव्यांगांना एका क्लिकवर सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष ऍपची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक दिव्यांग बांधवांसाठी एक स्मार्टकार्ड तयार करण्यात येणार असून त्यामध्ये त्यांना देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या थेरपी, उपचार आणि त्यांची वैयक्तिक आवश्यक माहिती संग्रहित करण्यात आहे, जेणेकरून त्यांना अगदी सहजपणे सुविधांचा लाभ घेता येईल. यासाठी शहरातील दिव्यांग बांधवांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
१७ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत दिव्यांग बांधवांसाठी महापालिकेच्या वतीने पर्पल जल्लोष तथा जल्लोष दिव्यांगत्वाचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांसाठी आयोजित केलेला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असून असा उत्सव राबविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका ठरणार आहे. याद्वारे दिव्यांग बांधवांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत मिळणार असून त्यांनी बनविलेल्या वस्तूंचे स्टॉल देखील उभारण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दिव्यांगांसाठी खास चित्रपट महोत्सवाचेही आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती देखील यावेळी आयुक्त सिंह यांनी दिली.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, महापालिकेने उभारलेले दिव्यांग भवन हा इतर महापालिकांसाठी एक पथदर्शी प्रकल्प ठरला असून विविध महापालिकांचे अधिकारी या भवनाला भेटी देत आहेत. शासनाचा “दिव्यांगांच्या दारी” हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविणारी पिंपरी चिंचवड महापालिका महाराष्ट्रात अग्रेसर ठरली. प्रत्येक दिव्यांग बांधवाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील आहे. तसेच दिव्यांग भवनाद्वारे दिव्यांग बांधवांना अधिकाधिक अत्याधुनिक सुविधा, मदत आणि सहकार्य करण्यासाठी महापालिका नेहमी कटिबद्ध असणार आहे.
दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिका ही दिव्यांग बांधवांसाठी सर्वाधिक योजना राबविणारी महापालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या महापालिकेने दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत. शहरातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच अधिक व्यापक आणि बदलत्या काळाशी समरूप असलेल्या कौशल्य प्रशिक्षण योजना राबविण्यावरही महापालिका भर देत आहे. दिव्यांग भवनामार्फत विविध प्रकारचे थेरपी व उपचार देण्यात येत असून आगामी काळात आयुर्वेदिक उपचाराचांही समावेश करण्याचा महापालिकेचा मानस आहे.
प्रास्ताविकपर भाषणात बोलताना सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट म्हणाले, समाज विकास विभागाने दिव्यांग नागरिकांकरिता दिव्यांगांचा सामुहिक विवाह सोहळा तसेच दिव्यांग नागरिकांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यासाठी फिरत्या वाहनावरील (तीन चाकी ई-वाहन) दुकान उपलब्ध करून देणेबाबत या दोन अभिनव योजना या आर्थिक वर्षात अंमलात आणल्या आहेत.
यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये दिव्यांग भवन प्रकल्पाच्या उभारणीमध्ये विशेष कामगिरी केलेले अभिजीत मुरूगकर, कविता मुरूगकर, गेली १० वर्षे दिव्यांग सेवेत कार्यरत असलेले राजेंद्र वाघचौरे, २४ व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेमध्ये ४ सुवर्ण तसेच १ कांस्य पदक आणि महाराष्ट्र शासन सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी या वर्ग २ पदासाठी निवड झालेल्या वैष्णवी जगताप, १६ व्या राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग स्पर्धेत १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्ण आणि ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्य पदक मिळविलेले संकल्प बोत्रे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. याव्यतिरिक्त नंदनवदन कुष्ठपिडीत बहुद्देशिय संस्थेचे प्रतिनिधी, प्रहार अपंग क्रांती आंदोलन संस्थेचे प्रतिनिधी, ब्रम्हदत्त विद्यालयातील १५ व्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे दिव्यांग विद्यार्थी, जिल्हास्तरीय संगीत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे दिव्यांग विद्यार्थी, पताशीबाई रतनचंदमानव ट्रस्ट या अंधशाळेतील संगीत क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी, १५ व्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेत आणि जिल्हास्तरीय दिव्यांगांच्या आंतरशालेय नाट्यस्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे अभिराज फाऊंडेशनचे विद्यार्थी, सुरत व गुजरात येथे राष्ट्रीय साद परिषद येथील चित्र व हस्तकलेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी, घरकुल अपंग सहाय्य संस्थेचे प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड कर्णबधिर असोसिएशनचे दिव्यांग नागरिक, विद्यार्थी, अंध असतानाही गेल्या २५ वर्षांपासून पायी आषाडीवारीला जाणारे किर्तनकार विजय कुदळे, आंतराष्ट्रीय पातळीवर बुद्धीबळ या खेळामध्ये प्राविण्य प्राप्त करत भारताला ४ पदक मिळवून देणारे मिलिंद सावंत, मूक-बधिर सोयायटीमधील अंध नागरिकांच्या समस्या सोडविणारे नागरिक यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. तर सामाजिक दायित्व निधीत भरीव मदत करणारे मे.बी.एम.सी सॉफ्टवेअर कंपनीचे सीएसआर हेड दिवांजी चावला, भाग्यलक्ष्मी, सोनाली वाघ, ब्रिजस्टोन इंडिया कंपनीचे सीएसआर हेड रानु कुलश्रेष्ठ, सैफुल हक, निकीता गुल्हाने यांचा समावेश होता.
दरम्यान, चिंचवड येथील मूक- बधीर विद्यालयातील मुलांच्या सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भोसरी येथील पताशीबाई रतनचंदमानव कल्याण ट्रस्ट अंधशाळेतील विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले.भाग्यश्री मोरे, संगिता जोशी यांनी व्हीलचेअर डान्स सादर केला. तर दिव्यांग बांधवांचा समावेश असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी, आभार प्रदर्शन विशाल शेडगे यांनी तर सुत्रसंचालन पौर्णिमा भोर यांनी केले.


