पुणे : तुम्ही चित्रपटातून काय दाखवता, याचे पडसाद जगभरात उमठतात. आज ओटीटी सारख्या माध्यमाद्वारे सर्व जग एकत्र येवून एकाच पाटावर बसते, तेव्हा तुमचा देश, इतिहास, भाषा हे चित्रपटातून जगाला कळते. आपली मूळ ओळख काय आहे, हे समाजासमोर दाखविण्यासाठी चित्रपट, नाटक, सिनेमांतून आणि रोजच्या चर्चांमधून देखील ती ओळख दिसली पाहिजे. त्यामुळे नाटक आणि सिनेमा करताना भान बाळगून करणे गरजेचे आहे. ते संस्कारांचे मोठे माध्यम आहे, असे प्रतिपादन चित्रपट निर्माते प्रविण तरडे यांनी केले.
संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताची ‘श्रीमंतयोगी २०२५’ या दैनंदिनी प्रकाशन सोहळ्याचे आयोजन भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्कार भारती अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सतिश कुलकर्णी , पश्चिम प्रांत अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे व पश्चिम प्रांत महामंत्री प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास दर्शवणारी ‘श्रीमंतयोगी २०२५’ ही दैनंदिनी प्रकाशित करण्यात आली. मूर्ती शास्त्राचे अभ्यासक डॉ.गो.बं. देगलूरकर यांनी यावेळी संदेश पत्रातून शुभेच्छा दिल्या.
प्रविण तरडे म्हणाले, आपली संस्कृती कोणाच्या मुळावर उठणारी नाही, तर आनंदाने जगा असे सांगणारी आहे. संस्कार भारतीच्या उपक्रमातून ती संस्कृती जोपासण्याचे काम होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
सतिश कुलकर्णी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासामध्ये, कारकिर्दीमध्ये महाराज कोणत्या दिवशी कोणत्या मोहिमेवर होते त्या दिवशी कोणता विशेष प्रसंग घडला, कोणता पराक्रम गाजविला पराक्रम गाजविला हे त्या त्या दिवशी त्या तारखेला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी या दैनंदिनीत त्या प्रत्येक दिवसाच्या विशेष नोंदी केल्या आहेत.
आज इतिहासाची इतकी मोडतोड करून ठेवली आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस नक्की तारखेप्रमाणे साजरा करायचा की तिथीप्रमाणे, असा प्रश्न पडतो. प्रत्येकाची इतिहासाबद्दल आपापली अशी वेगळी भूमिका आहे अशा संवेदनशील विषयावर काम करायचे म्हणजे तज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहेच. जास्तीत जास्त अचूक नोंदी वाचकांपर्यंत जाव्यात हा प्रयत्न या दैनंदिनीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दैनंदिनीची निर्मिती करताना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासपूर्वक काम केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्वराज्य निर्मितीमध्ये योगदान दिलेले शिलेदार यांची काही चित्रे या दैनंदिन मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत तसेच महाराष्ट्रात शिल्पकारांनी छत्रपती शिवरायांचे अश्वारूढ पुतळे निर्माण केलेले आहेत त्याही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती आहेत त्याचाही समावेश या दैनंदिन मध्ये करण्यात आलेला आहे.
सूत्रसंचालन प्रांत सह महामंत्री विनायक माने यांनी केले. प्रांत महामंत्री प्रशांत कुलकर्णी यांनी आभार मानले.


