Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedबालचित्रपट महोत्सवाला ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद

बालचित्रपट महोत्सवाला ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवातील बालचित्रपट महोत्सवाला मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. शहरातील ज्ञानप्रबोधिनी, अहिल्यादेवी अशा अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी आवर्जून चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहून चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला. त्यामुळे मुलांच्या ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसादात चित्रपट महोत्सव संपन्न झाला. दरवर्षीच असा महोत्सव असायला हवा, अशी अपेक्षा मुलांनी व्यक्त केली.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव १४ डिसेंबरपासून सुरू झाला आहे. महोत्सवातील पुस्तक प्रदर्शनात सहाशेहून अधिक पुस्तक दालनांचा समावेश आहे. नव्या पिढीला पुस्तकांकडे आकर्षित करण्यासाठी चिल्ड्रन्स कॉर्नरअंतर्गत विविध उपक्रम महोत्सवात राबवण्यात आले. त्यात कार्यशाळा, स्पर्धांचा समावेश होता. त्याशिवाय फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये बालचित्रपटांचा महोत्सवही आयोजित करण्यात आला होता. १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत झालेल्या या बालचित्रपट महोत्सवाला मुले, पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. महोत्सवात पाच मिनिटांच्या शॉर्टफिल्मपासून पूर्ण लांबीच्या चित्रपटांचा समावेश आहे. मराठीसह इंग्रजी, पर्शियन, हिंदी, तुर्कीश, चायनीज, बंगाली, रशियन, तेलुगू अशा विविध भाषांतील शॉर्टफिल्म, डॉक्युमेंट्री, चित्रपट दाखवण्यात आले.

‘पुणे पुस्तक बालचित्रपट महोत्सव फारच मस्त होता. वेगवेगळ्या भाषांतील चित्रपट पाहायला खूप मजा आली. भाषा कळत नसली, तरी चित्रपटाची गोष्ट समजत होती. अशा प्रकारे वेगवेगळ्या देशांतील गोष्टी चित्रपटांतून पाहता आल्या. चित्रपटांमुळे वेगळे काही पाहायला, शिकायला मिळाले. दरवर्षी असा चित्रपट महोत्सव व्हायला हवा,’ अशी भावना मुलांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments