पुणे : धर्म,अर्थ,काम,मोक्ष हे चार पुरुषार्थ भगवंताचे गुणगान केल्यास मनुष्याला प्राप्त होतील. जीवनात मनुष्याने सगळ्यात आधी धर्माचे पालन केले पाहिजे. अर्थाची आवश्यकता आहे. परंतु अर्थ हे धर्माच्या छायेत असले पाहिजे. धर्माच्या छायेत अर्थ आल्यामुळे सात्विक कामना जन्म घेते आणि त्यामुळे परमार्थ होऊन मोक्षाची प्राप्ती होते,असे पूज्य राजन जी महाराज यांनी सांगितले.
श्री गौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजानाथ मंदिर राम कथा समितीतर्फे श्रीराम कथा प्रेम यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे आयोजित कथा सोहळ्यात सहाव्या दिवशी प्रेममूर्ती पूज्य संत श्री प्रेमभूषणजी महाराज यांचे कृपापात्र पूज्य राजन जी महाराज यांनी निरूपण केले.
पूज्य राजन जी महाराज म्हणाले, भगवंताची प्रार्थना केल्यास अडचणी येणार नाहीत किंवा पूजा पाठ केल्यावर आजार-रोग होणार नाहीत, या भ्रमात राहू नका. संकटे ही येणारच आहेत. परंतु भगवंताची प्रार्थना केल्यास त्या संकटांचा प्रभाव तुमच्या मनावर पडणार नाही. हा भगवंताच्या प्रार्थनेचा लाभ आहे. मनुष्य हा कोणत्याही वस्तू मुळे नाही, तर साधनेमुळे सुखी होतो. जीवनात केलेले सत्कर्मच आपल्याला सुखी करू शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कथा सोहळ्याचे आयोजन दि. २२ डिसेंबर पर्यंत दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ यावेळेत चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे करण्यात आले आहे. श्रीराम कथा प्रेमयज्ञ सोहळ्यात श्री राम मंगल यात्रा, श्री भरत चरित्र, श्री शबरी प्रेम, सुंदरकाण्ड आणि श्री राम राज्याभिषेक याविषयी पूज्य राजनजी महाराज हे निरूपण करीत आहेत. सोहळ्याकरिता प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठया संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.


