पुणे, २१ डिसेंबर : ‘प्राचीन भारताचा इतिहास समजून घेतल्यास भविष्याची दिशा अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल,’ असे मत लेफ्टनंट कमांडर नीरज वसिष्ठ (निवृत्त) यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘रामायणात मानवतेची मूल्ये असून, संपूर्ण विश्वासाठी मार्गदर्शक आहेत,’ असेही त्यांनी नमूद केले.
‘अयोध्या ते अय्युथया’ या आपल्या लोकप्रिय पुस्तकाच्या अनुषंगाने नीरज वसिष्ठ यांनी आपले विचार मांडले. श्रुतिका यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी नीरज वसिष्ठ यांनी भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक समानता आणि अयोध्या व थायलंडची राजधानी बँकॉकपासून ७० किमी दूर असलेल्या अय्युथया या दोन ऐतिहासिक नगरांमधील सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय व धार्मिक संबंधांचा सखोल उलगडा केला.
‘थायलंडसह दक्षिण पूर्व आशियाई देश भारताशी सांस्कृतिक दृष्ट्या जोडलेले आहेत. थायलंडची सूर्य मंदिरे, कंबोडियातील अंकोरवट मंदिर समूह त्याची साक्ष देतात. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यासह अनेकांनी हे सांस्कृतिक संबंध शोधण्याचा प्रयत्न केला. विविध पुरातत्व सर्वेक्षणे सुरू असून, दक्षिण पूर्व आशियाई देशांचे ऐतिहासिक सांस्कृतिक संबंध आणखी प्रकाशात येतील,’ असा विश्वास नीरज वसिष्ठ यांनी व्यक्त केला.
‘थायलंडमध्ये दक्षिण चीन मधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. त्यानंतर चीनकडून थायलंडला आपल्या बाजूने ओढण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. मेंडेरिन ही चीनी भाषा थायलंडमध्ये तेथील दुसरी भाषा झाली आहे. अशा वेळी भारताने धार्मिक-राजकीय संबंधातून थायलंडशी असलेले नाते अधोरेखित केले पाहिजेत. त्यासाठी भारत प्रयत्न करत आहे,’ असेही नीरज वसिष्ठ म्हणाले.


