पुणे २८ डिसेंबर २०२४ – प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या पर्वातील सर्वात मोठी आणि विजेता ठरवणारी लढत उद्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. हरियाना स्टिलर्स आणि पाटणा पायरेट्स या दोन तगड्या संघात यंदाची अंतिम लढत रंगणार आहे. हरियानाला पहिल्या, तर पाटणा संघाला चौथ्या विजेतेपदाची आस लागून राहिली आहे.
मनप्रीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हरियाना स्टिलर्सने सलग दुसऱ्या हंगामात अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला आहे. कर्णधार जयदीपच्या नेतृत्वही महत्वाचे ठरत आहे. भक्कम बचावफळी म्हणूनव हरियाना स्टिलर्सकडे बघितले जाते. इराणचा महंमद रेझा शाडलूई हे हरियाना स्टिलर्स संघाचे बचावातील मुख्य अस्त्र असेल. गेल्या हंगामात पुणेरी पलटणकडून विजेतेपदाचा आनंद घेणारा शाडलुई आता सलग दुसरी अंतिम फेरी खेळत आहे. विशेष म्हणजे शाडलुई यापूर्वी पाटणा संघाकडूनही खेळला आहे.
कबड्डी लीगच्या ११व्या पर्वातील अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास खूप मोठा आहे. मी जरी माझ्या पूर्वीच्या संघाविरुद्ध खेळत असलो, तरी त्याचे कुठलेही दडपण माझ्या खेळावर येणार नाही. माझे लक्ष पुन्हा एकदा विजेतेपदाच्या करंडकाकडे लागून राहिले आहे. संघातील प्रत्येक खेळाडू या क्षणासाठी आतूर आहे, असे शाडलुई म्हणाला.
या लवर्षी हरियाणा स्टिलर्सच्या यशाच्या प्रवासात विनय, शिवम पठारे आणि राहुल सेठपाल या खेळाडूंचाही मोठा वाटा आहे. हरियाना स्टिलर्सला १०व्या पर्वात अंतिम फेरीत पुणेरी पलटणकडून पराभव पत्करावा लागला होता.
गेल्या वर्षी आम्ही अंतिम फेरीत हरलो असलो, तरी नंतर आम्ही खूप मेहनत घेतली आहे. या हंगामात आम्ही त्या उणिवा भरुन काढण्याचा जरुर प्रयत्न केला आहे. लीगचा कालावधी नसतानाही आमची सातत्याने प्रशिक्षण सत्रे सुरु होती. प्रत्येक खेळाडूने खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे आम्हाला या वेळी विजेतेपदाची खूप आशा आहे. पाटणा पायरेट्सशी आमचे शत्रुत्वा आहे. अर्थात, या लढतीसाठी जो कोणी संघ आमच्यासमोर असता त्याच्याशी आमचे शत्रुत्वच राहिले असते. आम्ही विजेतेपद मिळविण्याचा जरुर प्रयत्न करु, असे कर्णधार जयदीप म्हणाला.
दुसरीकडे तीन वेळा विजेतेपदाचा अनुभव असलेला पाटणा पायरेट्स संघ आणखी एका विजेतेपदासाठी उत्सुक आहे. नरेंदर रेड्डू याच्या नव्या दम्याच्या खेळाडूंनी पाटणा संघाच्या आव्हानात जान आणली आहे. देवांक दलाल आणि अयान लोहछाब यांची चढायांमधीलस अविश्वसनीय कामगिरी हीच त्यांची खरी ताकद राहिली आहे. देवांक यंदाच्या हंगामात सर्वाधक गुण मिळविणारा चढाईपटू ठरला आहे. तो आता तीनशे गुणांच्या उंबरठ्यावर आहे. ही कामगिरी त्याने अंतिम फेरीत गाठली तरक, तो लीगच्या इतिहासात पवन सेहरावत आणि परदीप नरवालनंतर अशी कामगिरी करणारा तिसरा चढाईपटू ठरेल.
प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाने माझ्यावर विश्वास दाखवला हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यांच्या विश्वासाची परतफेड मी चांगल्या कामगिरीने करु शकलो. प्रत्येक टप्प्यावर संघातील सहकाऱ्यांनी साथ दिल्यामुळेच ही कामगिरी करु शकलो, असे देवांक म्हणाला.
पाटणा पायरेटस संघाने यंदाच्या हंगामात तरुण आणि नवोदित खेळाडूंना घेऊन संघ बांधणीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले. त्यानंतर यु मुम्बा आणि दबंग दिल्लीसारख्या मातब्बर संघांवर विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. यंदाच्या हंगामात पाटणाला अद्याप हरियानावर विजय मिळवता आलेला नाही. आता थेट विजेतेपदाच्या लढतीत ते साध्य करण्याची वेळ आली आहे. यासाठी देवांक, अयान, जयदीप, अंकित यांच्यावर अवलंबून रहावे लागणार आहे.
लीगच्या ११व्या पर्वात विजेते बनण्याचे आमचे स्वप्न आहे. जो कोणी चांगला खेळेल आणि मानसिकता टिकवून ठेवेल तोच विजेता म्हणून पुढे येईल. हा एक मोठा अंतिम सामना आहे. त्यामुळे अधिक तीव्रतेने खेळला जाईल, असे पाटणा संघाचा कर्णधारप अंकित म्हणाला.
संपूर्ण हंगामात हरियाना स्टिलर्सचा बचाव भक्कम राहिला आहे. तो भेदण्याचे धाडस कुणाला जमले नाही. मात्र, अंतिम सामनयात पाटणा पायरेट्सचे चढाईपटू ते धाडस करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे एका कमालीच्या संघर्षपूर्ण लढतीने प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या पर्वावर पडदा पडणार आहे.


