पुणे : संगीतमय हनुमान चालीसा पाठामध्ये विविध भजनांच्या चालीवर आधारित ११ संगीतमय हनुमान चालीसा पाठ आणि महाआरतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव मंदिरात साजरा केला. गणपती बाप्पा मोरया…सह रामनामाचा जयघोष मंदिर परिसरात ऐकू येत होता.
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने पारंपारिक वेशात उपस्थित होते. श्रीराम पंचायतन याग आणि श्रीराम जप याने तीन दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला होता. सामुहिक श्रीराम रक्षा स्तोत्र पठण देखील ५० महिलांनी केले. पठणात सहभागी झालेल्या महिला श्रीराम मंदिर अयोध्या तीर्थ क्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरिजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरु असलेल्या गीता परिवार पुणे या संस्थेतील होत्या.
श्री सालासर हनुमान चालीसा मंडल, पुणे तर्फे संगीतमय हनुमान चालीसा पाठाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध भजनांच्या चालीवर आधारित ११ संगीतमय हनुमान चालीसा पाठाचा कार्यक्रम पार पडला. मंडलाचे प्रशांत मुंदडा,सचिन जाजू, धिरज मुंदडा, प्रशांत राठी, निलेश जाजू, निलेश सारडा यांनी संयोजन केले. दुपारी १२.३० वाजता श्रीं ची महाआरती देखील करण्यात आली. मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिराबाहेर आणि उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे सकाळपासून प्रसाद वाटपकरण्यात आले. यामद्ये भक्तांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.


