पुणे : नारी हू कमजोर नही…महाराष्ट्रात परी नाही वीरांगना जन्म घेतात…काली बन कर शीश काटे जब बात आयी सम्मान की…..अशा घोषणा देत राणी दुर्गावती, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर यांना महिलांनी पथ संचलनातून मानवंदना दिली. यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि युवती सदंड पथसंचलनात सहभागी झाल्या होत्या.
राणी दुर्गावती आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना मानवंदना देण्यासाठी विश्व हिंदू परिषद पूर्व व पश्चिम विभाग पुणे तर्फे मातृ शक्ती आणि दुर्गा वाहिनी मानवंदना संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ.अर्चना देशपांडे, विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, राष्ट्र सेविका समितीच्या लताआशा कोल्हटकर, प्रिया रसाळ, दुर्गावाहिनीच्या सोनाली नाथ तसेच महिला पदाधिकारी व पुणे शहरातील विहिंपचे अनेक पदाधिकारी उपस्थित यावेळी उपस्थित होते.
मानवंदना संचालन समारोप प्रसंगी डॉ.अर्चना देशपांडे म्हणाल्या, आपण ज्या महिलांना आदर्श मानतो त्या महिलांनी आपल्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे समर्पित होऊन कार्य केल्यामुळे त्यांना बदल घडविता आला. त्याचप्रमाणे आजच्या तरुणीने आपल्या क्षेत्रामध्ये पूर्णतः लक्ष केंद्रित करून कार्य केले पाहिजे. महिलांनी व्यक्त झाले पाहिजे, तरच त्यांच्या वर होणारे अन्याय समाजासमोर येऊ शकेल.
किशोर चव्हाण म्हणाले, विश्व हिंदू परिषद गेल्या ६० वर्षांपासून बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी अशा विविध प्रकारच्या शाखांच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्याचे काम करत आहे. बजरंग दलाचे नाव घेताच ज्याप्रमाणे समाजामध्ये सकारात्मक धडकी भरते त्याचप्रमाणे महिलांवरील अन्याय दूर करण्याकरिता दुर्गा वाहिनी ही सतत कार्यरत असते. दुर्गा वाहिनीच्या महिलांच्या नावाने यापुढे एक प्रकारे दहशत निर्माण होऊन लव जिहाद सारखे प्रकरण होणार नाही यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे. आजच्या तरुणींनी आपण लव जिहाद मध्ये अडकणार नाही आणि आपल्या मैत्रिणींनाही अडकू देणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
प्रिया रसाळ म्हणाल्या, हिंदू धर्मामध्ये महिलांना कायम सन्मानाची वागणूक देण्यात आली आहे. त्यांच्यातील गुण ओळखून त्यांना समाजामध्ये पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले आहे. आज हिंदू धर्मातील शिकवण अंगीकारून महिलांनी स्वतःचे संरक्षण केले पाहिजे, महिला जेव्हा स्वतः स्वतःचे रक्षण करू शकतील तेव्हा खऱ्या अर्थाने समाज संरक्षित झाला, असे आपण म्हणू शकतो.
लताआशा कोल्हटकर यांनी, अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र सांगितले आणि अहिल्याबाई होळकरांसारखे, देव देश आणि धर्माप्रती, निष्ठावान होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. मानवंदना संचलन यशस्वी करण्यात विहिंप पुणे महानगरातील महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले होते.
—


