पुणे, दि. 29 जानेवारी: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या वर्षी हा पुरस्कार अहमदाबाद येथील आयआयएमचे संचालक प्रा.भरत भास्कर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू, डब्ल्यूएचओचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ व एम एस स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, सुप्रसिध्द चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक विवेक अग्निहोत्री आणि प्रख्यात गायक व संगीतकार शेखर सेन यांना देण्यात येणार आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते व सर्च फाऊंडेशनचे संचालक पद्मश्री डॉ. अभय बंग व डाॅ. राणी बंग यांना विशेष जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांनी दिली.
हा कार्यक्रम सोमवार,3 फेब्रुवारी रोजी स. 10 वा. राजबाग, लोणी-काळभोर येथील जगातील सर्वात मोठ्या वर्ल्ड पीस डोम मध्ये होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी सव्वा लाख रुपये रोख, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे 21वे वर्ष आहे.
जागतिक दर्जाचे संशोधन व समाजावर शाश्वत प्रभाव निर्माण व्यवस्थापनाच्या क्षेत्रात विशेष यश संपादन केल्याबद्दल प्रा. भरत भास्कर यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. हवाई प्रवास सुलभ व सामान्यांना परवडेल आणि देशाची प्रगती साधण्याच्या कार्यासाठी राम मोहन नायडू किंजरापू यांना ‘भारत अस्मिता जन प्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्काराने’ गौरविण्यात येईल. बौध्दिक क्षेत्रात बहुआयामी व्यक्तिमत्त्व, चित्रपट निर्माता, लेखक विवेक अग्निहोत्री आणि रंगभूमीच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल शेखर सेन यांना ‘भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्काराने’ गौरविण्यात येणार आहे. भारतीय वैद्यकीय संस्थांमध्ये संशोधन क्षमता वाढवणे आणि आरोग्य विज्ञानात जागतिक भागीदारी वाढवण्यावर भर देणार्या शास्त्रज्ञा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना ‘भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
त्याच प्रमाणे पद्मश्री डॉ. अभय बंग व डाॅ. राणी बंग यांनी संपूर्ण आयुष्य आरोग्यसेवे बरोबरच ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना भारत अस्मिता जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
आपल्या आचार, विचार, कृतीने व सेवेने ज्यांनी देशाच्या नाव लौकिकात भर टाकली. विविध मार्गाने आपली अमूल्य सेवा देशाला समर्पित केली अशा व्यक्तींच्या गौरवासाठी या पुरस्काराची योजना आहे.
या पुरस्काराचे मुख्य उद्दिष्टे म्हणजे भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्काराद्वारे विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावणार्या व्यक्तींच्या कार्याची माहिती तरुण पिढीला व्हावी व या पिढीने त्या मार्गावर चालण्याची जिद्द बाळगावी हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.
जनसंपर्क विभाग,
एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे.
‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार 2025’
पुरस्कारार्थींचा संक्षिप्त परिचय
1: ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार ’2025
प्रा.भरत भास्कर ः प्रख्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ आहेत. समृध्द उद्योग, धोरणनिर्मिती आणि समाजावर प्रगतीशील आणि शाश्वत प्रभाव निर्माण करण्याचे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्व सामान्यांचे जीवन उंचाविण्यासाठी त्यांनी केलेले संशोधन अत्यंत महत्वाचे आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांमध्ये ते ज्ञानाचा प्रसार करीत आहेत.
2: ‘भारत अस्मिता जन प्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार ’2025
श्री.राम मोहन नायडू किंजरापू ः 16, 17 व 18 व्या लोकसभा निवडणुकीत सलग निवडुन आले आहेत. सध्या त्यांच्याकडे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री पदाची जबाबदारी आहे. हवाई प्रवास अधिक सुलभ आणि परवाडणारे बनवण्याचा प्रयत्न, विमान प्रवासाचे वाढते भाडे आणि विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा उपाययोजना वाढवणे या सारख्या आव्हानांना तोंड देत आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे, विशेषतः भारत आणि चीन दरम्यान पुन्हा सुरू करण्याच्या चर्चेतही ते सक्रिय राहिले आहेत.
3: ‘भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ 2025
1ःश्री. विवेक अग्निहोत्रीः भारतीय चित्रपटसृष्टीत कथाकथनाची पुर्नपरिभाषा करण्याच्या दृष्टिकोनासह, अग्निहोत्री यांचा प्रवास महत्वाकांक्षी चित्रपट निर्माते आणि परिवर्तन घडवणार्यांनी प्रेरणादायी ठरतो. 1990 च्या दशकातील काश्मिरी हिंदूच्या पलायन आणि दुर्दशेवर प्रकाश टाकणारा द कश्मीर फाइल्स चित्रपटाने देशात खळबळ माजली. ते एक कुशल लेखक, सर्जनशील आणि बौद्धिक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.
2: श्री. शेखर सेनः गायक, संगीतकार आणि गीतकार म्हणून त्यांच्या 250 हून अधिक कॅसेट आणि सीडी रिलीज झाल्या आहेत. चित्रपट, टीव्ही बरोबरच जगभरात 1500 हून अधिक भजन मैफिली केल्या आहेत. ते अभिनेता, लेखक, गायक, दिग्दर्शक, नाटककार आणि संगीतकार म्हणून त्यांचा मोनो अॅक्ट संगीत नाटकाचे 1109 पेक्षा जास्त शो झाले आहेत. ते सेन्सॉर बोर्डाचे सदस्य होते. संगीत रचनाकार संघटनेचे आजीवन सदस्य आहेत.
4: ‘भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ 2025
डॉ. सौम्या स्वामीनाथन ःभारत सरकारच्या आरेाग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या प्रमुख सल्लागार असलेल्या डॉ. सौम्या एक प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ, क्षयरोग आणि एचआयव्ही संशोधनातील जागतिक तज्ज्ञ आहेत. क्लिनिकल केअर आणि संशोधनात 40 वर्षाहून अधिक अनुभव असून प्रभावी आरोग्य कार्यक्रमांमध्ये रूपांतर करण्याची कारकीर्द समर्पित केली आहे. आरोग्य धोरण निर्मितीमध्ये विज्ञानाचे एकत्रिकरण, भारतीय वैद्यकीय संस्थांमध्ये संशोधन क्षमता वाढवणे आणि आरोग्य विज्ञानात जागतिक भागीदारी वाढवणे आहे.
भारत अस्मिता जीवन गौरव पुरस्कार :
पद्मश्री डॉ. अभय बंग व डाॅ. राणी बंग हे एक थोर समाजसेवक आहेत. डॉक्टरी पेशा असलेले हे दांपत्य चार दशकाहून अधिक काळ सामुदायिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. नाविन्यपूर्ण आरोग्यसेवा हस्तक्षेप, धोरण आणि तळागळातील सक्रियता द्वारे ग्रामीण भारतातील जीवन बदलविले आहे. गडचिरोली येथे सर्च फाऊंडेशनची स्थापना करून उपेक्षित समुदायांसाठी आरोग्य सेवा देत आहेत. घर आधारित नवजात आरोग्यसेवा वरील क्रांतिकारी संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. आरोग्य सेवेबरोबरच ते सामाजिक न्याय, शाश्वत विकास आणि आदिवासी सक्षमीकरणाचे उत्कृष्ट समर्थक आहेत.


