पुणे : तुळशीबाग गणपतीचा गणेशोत्सव १२५ वर्षाची भव्य आणि दिव्य परंपरा लाभलेला आहे. लाखो कार्यकर्ते गणेशोत्सवाने समाजाला दिले. गणेशोत्सवाने परंपरेच्या माध्यमातून विविध धर्माच्या आणि जातीच्या लोकांना बांधून ठेवले आहे. या उत्सवाने पुण्याला वेगळी ओळख दिली आहे. सामान्य कार्यकर्त्यांनी असामान्यत्वाला नेलेला हा पुण्याचा गणेशोत्सव आहे, असे मत आमदार हेमंत रासने यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५) वर्ष साजरे करीत आहे. उत्सवाच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी आमदार हेमंत रासने, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते बोधचिन्हाचे अनावरण झाले. लालबाग गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, कसबा गणपतीचे श्रीकांत शेटे, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित उपस्थित होते.
बाळासाहेब कांबळे म्हणाले, लालबाग ते तुळशीबाग असा संबंध आज जोडला गेलेला आहे आणि हा अनुभव अद्वितीय आहे. लालबागच्या राजाच्या उत्सवाची सुरुवात मे महिन्यापासूनच केली जाते. जगभरातील भाविकांपर्यंत लालबागच्या राजाचा गणेशोत्सव पोहोचला आहे. लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी दीड ते दोन कोटी भाविक दरवर्षी येतात. यावेळी मंडळाचे चार ते साडेचार हजार कार्यकर्ते दिवस-रात्र काम करत असतात. या काळात १२ ते १७ कोटींचा निधी जमा होतो आणि हा निधी भाविकांच्याच कामासाठी वापरला जातो. गणेशोत्सव कार्यकर्ता कुठेही गेला तरी तो चमकत असतो कारण त्याला कर्तृत्वाचे तेज असते.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, एखाद्या गणेशोत्सव मंडळाने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणे हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. तुळशीबाग गणपती मंडळाचे कार्यकर्ते दिवस रात्र झटून काम करत असतात. तुळशीबाग केवळ पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात देखील प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे श्री तुळशीबाग गणपती मंडळाचा देखील नावलौकिक आहे.
श्रीकांत शेटे म्हणाले, पुण्याचा गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह देशात देखील प्रसिद्ध आहे. पुण्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेरचे लोक पुण्यात येतात त्यांना आपली संस्कृती ची ओळख करून देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रासाठी कौतुकास्पद ठरणारे गणेश भवन उभारावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नितीन पंडित म्हणाले, श्री तुळशीबाग गणपतीच्या १२५ व्या वर्ष उत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण होत आहे, ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. गणेशोत्सवाची चळवळ ही पुण्यातून सुरू झाली आहे. पुण्यातील गणपती मंडळांमध्ये स्पर्धा नाही तर एकमेकांच्या सहकार्याने हा गणेशोत्सव पुढे जात आहे. पराग ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. मयूर दिवेकर यांनी आभार मानले.


