पुणे,4 फेब्रुवारी 2025 : नुक्कड कॅफेचा सामाजिक उपक्रम असलेल्या पालविया फाऊंडेशन तर्फे 1 आणि 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान पुण्यात वस्तीतील पहिल्या कला महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा अनोखा कार्यक्रम बर्मा शेल बस्ती, एअरपोर्ट रोड येथे पार पडला. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात मुलांमध्ये सर्जनशीलता,एकता आणि मानसिक आरोग्य वाढविण्यासाठी तयार केलेली कला प्रदर्शने,कार्यशाळा,सादरीकरणे आणि सांस्कृतिक उपक्रमांची श्रेणी सादर करण्यात आली.
या कला महोत्सवाचे उद्घाटन माजी नगरसेविका मुक्ता जगताप,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगचे मेजर मनोज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एनएचआरडी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष अमन राजाबली,एमआयटी इन्स्टिट्युट ऑफ डिझाईनचे अधिष्ठाता प्रा.आनंद बेल्हे,लँडस्केप आर्टिस्ट गोविंद डुंबरे, आयआयएम-बी चे प्रा.जुगल चौधरी,सोशल मिडिया इन्फ्लुएंसर सर्वेश देशपांडे,लेखक अक्षय बिक्कड आणि रॅप आर्टिस्ट आशुबॉय यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
या दोन दिवसीय महोत्सवात बर्मा शेल बस्ती आणि इतर आसपासच्या परिसरातील कलाकारांनी सादरीकरण केले.यामध्ये मुलांनी आपल्या जीवनाबद्दलची धारणा सर्जनशीलपणे व्यक्त करत वारली आणि मांडला कलाकृती प्रदर्शित केल्या. याबरोबरच सॅटर्डे आर्ट क्लासच्या कार्यशाळेत माधवी पारेख यांनी इमॅजिनिटिव्ह क्रिएचर्स आणि रूद्र मित्रा यांनी क्राफ्ट कार्ड मेकिंगचे सत्र घेतले. यावेळी डॉ.आयेशा बुटालिया यांनी भरतनाट्यम नृत्य सादर केले.तसेच कल्चरल कनेक्ट तर्फे पथनाट्य व वस्तीतील महिला आणि मुलांनी सादर केलेल्या बॉलिवूड गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले. याबरोबरच एमआयटी-एडीटी येथे पपेट शो,रॅप आर्टिस्ट आशुबॉय यांचे रॅप सादरीकरण आणि मिलिटरी इंजिनिअरींग कॉलेजच्या कॅडेट ट्रेनिंग विंगमधील कॅडेट अधिकाऱ्यांनी आकर्षक संगीत सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी बोलताना पालविया फाऊंडेशन आणि नुक्कड कॅफेचे संस्थापक वैभव पालिवाल म्हणाले की, हा कला महोत्सव म्हणजे सामाजिक व आर्थिक समस्यांच्या पलीकडे जाऊन, चांगले आरोग्य,सामाजिक बांधिलकी आणि सुसंवाद निर्माण करणे आहे.
भाग्यशाली भविष्य शिक्षा फाऊंडेशन (बीबीएनजीओ) यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.तसेच नुक्कड कॅफे, कॅडेट ट्रेनिंग विंग-सीएमई, एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, स्लॅम आऊट लाऊड, नॅशनल एचआरडी नेटवर्क,कल्चरल कनेक्ट, कलमोझिक फाऊंडेशन आणि सॅटरडे आर्ट क्लास या भागीदारांचा सहयोग लाभला.


