पुणे,11 फेब्रुवारी2025:-: एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU), पुणे येथील संशोधकांनी पुण्यातील ड्रॅगनफ्लाय (चतुर) प्रजातींच्या ऐतिहासिक आणि सध्याच्या माहितीच्या आधारे त्यांच्या संख्येतील बदलांचे विश्लेषण करणारा महत्त्वपूर्ण अभ्यास सादर केला आहे. संशोधकांच्या निदर्शनास आले आहे की, ऐतिहासिक नोंदींमध्ये असलेले ड्रॅगनफ्लायचे आठ प्रकार पुण्यात आता दिसत नाहीत. म्हणजे त्या कदाचित नामशेष झाल्या असण्याची शक्यता आहे. अनियोजित शहरीकरण, पाण्याचे वाढलेले प्रदूषण आणि हवामानाच्या ऋतूचक्रात होणारे बदल ही यामागील कारणे असू शकतात. ऐतिहासिक नोंदींशी तुलना करता सत्तावीस नव्या प्रजाती आढळून आल्याची नोंदही करण्यात आली आहे. हौशी नागरिक आणि कीटकांच्या वैविध्यतेबद्दल असलेल्या दस्तावेजीकरणाच्या वाढत्या जागरुकतेमुळे हे शक्य झाले आहे. जमीनवापरात झालेला बदल, वेगाने होणारे शहरीकरण आणि विशिष्ट विश्लेषणासाठी किंवा निर्णयासाठी आवश्यक असलेली माहिती उपलब्ध नसणे किंवा त्यामध्ये अपूर्णता असणे या घटकांमुळे चतुरांच्या संख्येमध्ये होणारे बदल या अभ्यासात नोंदविण्यात आले आहेत.
या अभ्यासात पश्चिम घाटातील पाच स्थानिक प्रजातींची नोंद करण्यात आली. त्यामुळे पुणे हे ओडोनेटाच्या (ड्रॅगनफ्लाय आणि डॅम्सेलफ्लाय) अभ्यासासाठी महत्त्वाचे ठिकाण असल्याचे अधोरेखित होते. या प्रकारचा हा पहिलाच अभ्यास असून, यात पुणे जिल्ह्यातील ओडोनेटांच्या दीर्घकालीन कालानुक्रमिक वितरणाचा आढावा घेण्यात आला आहे. जवळपास दोन शतकांमध्ये प्रजातींची झालेली वाढ आणि घट याबाबत नव्याने माहिती समोर आली आहे.
डॉ. पंकज कोपर्डे (फॅकल्टी, पर्यावरण अध्ययन विभाग, एमआयटी – वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे) यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले असून, अर्जुष पायरा (पीएचडी स्कॉलर) आणि अमेय देशपांडे (माजी विद्यार्थी) यांच्या सहकार्याने त्यांनी हे संशोधन केले. या अभ्यासात ऐतिहासिक आणि समकालीन नोंदींचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. प्राथमिक डेटा 2019 ते 2022 या कालावधीत पुणे जिल्ह्यातील 52 ठिकाणांहून गोळा करण्यात आला, तर 19व्या शतकाच्या मध्यकालीन नोंदींसाठी 25 प्रकाशित लेख आणि सिटीझन सायन्स डेटाचा आढावा घेण्यात आला.
एमआयटी – वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU) येथील संशोधकांनी ‘ओडोनेट डायव्हर्सिटी इन द टाइमस्केप ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट अॅडजॉइनिंग द वेस्टर्न घाट्स बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट’ (पश्चिम घाटाच्या जैवविविधता हॉटस्पॉटला लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील ओडोनेट विविधता कालानुक्रमिक दृष्टिकोनातून) हा महत्त्वपूर्ण अभ्यास ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ट्रॉपिकल इन्सेक्ट सायन्स’मध्ये (स्प्रिंगर नेचर पब्लिशिंग) प्रकाशित केला आहे.
“ड्रॅगनफ्लाय हे अत्यंत महत्त्वाचे कीटक शिकारी असून, ते शहरी भागातील डास आणि अन्य कीटकांची संख्या नियंत्रित करण्यास मदत करतात. जंगलातील परिसंस्थेमध्ये वाघ जशी महत्त्वाची भूमिका बजावतो, तसेच ड्रॅगनफ्लाय पर्यावरणीय समतोल राखण्यास उपयुक्त ठरतात. त्यांच्या संख्येचे निरीक्षण करणे पर्यावरणाच्या आरोग्याचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक आहे,” असे या अभ्यासाचे प्रमुख संशोधक डॉ. पंकज कोपर्डे यांनी सांगितले.
ऐतिहासिक नोंदींच्या तुलनेने आजच्या संशोधकांना प्रगत डेटा संकलन तंत्रे, नागरिक विज्ञान उपक्रम आणि वाढलेली जागरूकता यांचा लाभ मिळत आहे. त्यामुळे जैवविविधतेचे कल अधिक स्पष्टपणे समजून घेता येतात. या अभ्यासात वारजे आणि वेताळ टेकडी यांसह पाषाण तलाव ही पुणे महापालिका हद्दीतील सर्वाधिक जैवविविधता असलेली ठिकाणे म्हणून सुनिश्चित करण्यात आली आहेत.
या निष्कर्षांच्या आधारे, एमआयटी – वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU) येथील संशोधक सध्या मुळा नदी किनाऱ्यालगत झालेले शहरीकरण आणि जलप्रदूषणाचा ड्रॅगनफ्लायवर होणारा परिणाम अभ्यासत आहेत. तसेच, कालांतराने जैवविविधतेतील बदलांचे निरीक्षण करण्यासाठी दीर्घकालीन निरीक्षण प्रकल्प सुरू करत आहेत.
“डोंगर, गवताळ प्रदेश, नद्या आणि तलाव यांसारख्या शहरी हरित आणि निळ्या परिसंस्थांचे संवर्धन प्राधान्याने करणे आवश्यक आहे. वेगवान शहरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी शाश्वत विकास नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे या अभ्यासाचे सहसंशोधक अर्जुष पायरा म्हणाले.
हा अभ्यास पश्चिम घाटातील ड्रॅगनफ्लाय विविधतेवर सुरू असलेल्या व्यापक संशोधन उपक्रमाचा एक भाग आहे. हा उपक्रम भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वित्तीय सहाय्याने राबविण्यात येत आहे. संशोधकांच्या निष्कर्षांमुळे विविध जीवसमूहांमधील जैवविविधतेतील बदलांवर अधिक संशोधन होण्यास प्रेरणा मिळेल आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी दीर्घकालीन निरीक्षण प्रकल्प सुरू करण्यास प्रोत्साहन मिळेल.
———————————————————————————–
एमआयटी – वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या अभ्यासाच्या माध्यमातून घेण्यात आला पुण्यातील ड्रॅगनफ्लायच्या संख्येतील बदलांचा कालानुक्रमिक आढावा.
RELATED ARTICLES


