पुणे, १२ फेब्रुवारी २०२५ : नादसप्तक मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि.25 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात,रसिकांच्या अक्षरशः प्रचंड गर्दीत सादर केलेल्या “यमनरंग ” – या भारतीय शास्त्रीय संगीतामधील यमन (कल्याण ) या रागावर आधारित मराठी,हिंदी, संस्कृत आणि सिंधी या 4 भाषांमधील एकूण 108 गाण्यांच्या कार्यक्रमाची “विक्रमी नोंद ” इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये मोठ्या सन्मानाने आणि यशस्वीपणे झाली आहे.नुकताच वारजे येथील ओव्हल नेस्ट सभागृह येथे त्याचा प्रशस्तीपत्र वितरण सोहळा, मुंबईतील प्रख्यात चित्रपट व रंगभूमी अभिनेते अशोक कुलकर्णी आणि पुण्यातील ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांच्या हस्ते संपन्न झाला. यमनरंग मध्ये सहभागी सर्वांना आयबीआर कडून आलेल्या सर्टिफिकेटने गौरविण्यात आले.
“प्रसिद्ध गायक व संगीतकार गिरीश पंचवाडकर व त्यांचे सुपुत्र,युवा तबला वादक अक्षय पंचवाडकर यांनी खूप मेहनत घेऊन त्यांच्या विद्यार्थ्यांकडून सादर केलेला, यमन या परिपूर्ण रागामधील “यमनरंग” कार्यक्रम मी प्रत्यक्ष पाहिला आहे, आणि त्या सुंदर कार्यक्रमाची विक्रमी नोंद होणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे“ असेही अनुराधा मराठे म्हणाल्या.
“एखादे संगीत विद्यालय, संगीताचे शिक्षण देण्याबरोबरच, आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन किती मोठी झेप घेऊ शकते, याचे कदाचित पहिले आणि एकमेव उदाहरणं म्हणजे नादसप्तक विद्यालय…” असे गौरवोदगार अभिनेते अशोक कुलकर्णी यांनी याप्रसंगी बोलताना काढले.
प्रारंभी नादसप्तकच्या विद्यार्थ्यांनी गिरीश पंचवाडकर यांनी संगीतबद्ध केलेल्या- यमन से नमन आणि यमन तराणा या शास्त्रीय रचना सादर केल्या. डॉ.आदिती ताले यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूरी देशपांडे यांनी केले.
संतोष जोशी, दिपश्री डोळे, रूपा इनामदार,गायत्री उंब्रजकर,धवल ताले, नीरज फडके,भारत कोकीळ यांनी परिश्रम घेतले.
—


