पुणे – ‘ पाश्चिमात्य व्यवस्थेवरील अवलंबित्वामुळे आपण स्वतःची ओळखच विसरून गेलो आहोत. तेव्हा आधुनिकतेची कास धरतानाच आपल्यातील भारतीयत्वाचे स्वत्वही वृद्धिंगत करावे. या दृष्टीने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा विचार व्हावयास हवा,’ असे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि विद्या भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुणे शिक्षण परिषदेच्या सांगता सत्रामध्ये प्रभुणे बोलत होते.
‘ब्रिटिशपूर्व काळातील भारताची आपल्याला खऱ्या अर्थाने ओळख व्हावयास हवी. कोलंबससारखा आता भारतीयांनीच भारताचा शोध घ्यायला हवा. तेव्हा येथील ज्ञानशाखांचा साकल्याने धांडोळा घेणे, विकसित प्राचीन भारताच्या या प्रवाहात समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान समजावून घेणे अत्यावश्यक असल्याचे,’ मत प्रभुणे यांनी या पार्श्वभूमीवर व्यक्त केले.
पुणे शिक्षण परिषदेच्या या सांगता सत्रासमवेतच यावेळी शालेय शिक्षण आराखड्याचा प्रसार, त्यासाठी विविध ठिकाणी परिषदांचे आयोजन, आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भातील विविध ठराव संमत करण्यात आले.