विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व करिअर संधी मिळवून देण्यासाठी MIT-WPU आणि महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व टॅली एज्युकेशन यांच्यात सामंजस्य करार

तारां कित Avatar

पुणे, २५ फेब्रुवारी, २०२५: – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU) च्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्सने महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (MTPA)सोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव आणि कर व वित्त क्षेत्रातील व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, या क्षेत्रातील तज्ज्ञांची गेस्ट लेक्चर्स, कार्यशाळा आणि परिसंवाद यांच्या माध्यमातून कर प्रणालीबद्दल अनेक बारकावे समजतील. तसेच, या सामंजस्य करारांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष मूल्यवर्धित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, जे पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष उपयोग यातील दरी भरून काढण्यास मदत करतील.
या भागीदारीच्या महत्त्वाबद्दल MIT-WPUच्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड कॉमर्सच्या डीन डॉ. अंजली साने म्हणाल्या, “महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनसोबतच्या या सामंजस्य करारामुळे आमच्या विद्यार्थ्यांना कर कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळण्याची अमूल्य संधी मिळणार आहे. या सहयोगामुळे प्रत्यक्षातील कर प्रणालीसंदर्भातील त्यांचे आकलन वाढेल आणि शैक्षणिक ज्ञान व व्यावसायिक कौशल्य यातील दरी कमी होईल. त्यामुळे ते कर आणि वित्त क्षेत्रात कौशल्य आणि रोजगारक्षम व्यावसायिक म्हणून घडतील.”
या उपक्रमांतर्गत वाणिज्य शाखेतील दुसऱ्या व तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या सुमारे 600 विद्यार्थ्यांना दोन महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा लाभ मिळणार आहे. तसेच, अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यांना कर आणि संबंधित वित्तीय क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी एमटीपीए आवश्यक सहकार्य करेल.
या शिवाय, MIT-WPUच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्सने टॅली एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडसोबतही सामंजस्य करार केला आहे. या सहकार्याद्वारे विद्यार्थ्यांना लेखांकन (अकाउंटिंग), लेखापरीक्षण (ऑडिटिंग) आणि कर विषयक प्रत्यक्ष कौशल्य विकसित करता येईल. टॅली सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, हे सॉफ्टवेअर लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगसज्ज होण्यासाठी प्रशिक्षण मिळेल आणि त्यांची रोजगारक्षमता वाढण्यास मदत होईल.
डॉ. अंजली साने यांनी या सहकार्याचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, “टॅली एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडसोबतच्या या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांसाठी प्रगत शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या नव्या संधींची दालने खुली होणार आहेत. लेखांकन आणि व्यवसाय व्यवस्थापनातील मूलभूत कौशल्ये विकसित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. शैक्षणिक ज्ञान आणि उद्योगसज्ज कौशल्य यांच्यातील दरी भरून काढत, या उपक्रमामुळे वित्तीय क्षेत्रातील भविष्यातील नेतृत्व घडवण्यास मदत होईल.”
या भागीदारीमुळे MIT-WPUच्या उद्योगसुलभ अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाली आहे आणि कर, वित्त आणि वाणिज्य क्षेत्रातील करिअरसाठी विद्यार्थी सज्ज होतील, याची खातरजमा करण्यात आली आहे.
================================================

Tagged in :

तारां कित Avatar