पुणे, दि. ३० : रामजन्मभूमी जागतिक पातळीवरील पर्यटन स्थळ म्हणून अयोध्या विकसित होत आहे. अत्याधुनिक व भव्य राम मंदिरासह तयार होणाऱ्या विमानतळ व रेल्वेस्थानक व रस्त्यांबरोबरच तेथील अन्य सांस्कृतिक स्थळे सांस्कृतिक क्षेत्राच्या (कल्चरल लॅण्डस्केप) दृष्टिकोनातूनही तितक्याच जोमाने विकसित झाली पाहिजेत, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘पवित्र भूरचनातज्ज्ञ’ आर्किटेक्ट डॉ.अमिता सिन्हा यांनी व्यक्त केली. महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मध्ये अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त त्यांचे ‘अयोध्येतील पवित्र भूरचने’वर व्याख्यान व सादरीकरण झाले. जानेवारी २०१८ मध्ये डॉ. सिन्हा यांनी अयोध्येतील सांस्कृतिक क्षेत्राबाबत बीएनसीएमधील अकादमिक प्रमूख व जतन-संवर्धन वास्तुरचनाकार डॉ. शुभदा कमलापूरकर आणि संस्थेच्या ३५ विद्यार्थिनींबरोबर अयोध्येत कार्यशाळेच्या माध्यमातून या पवित्र क्षेत्राचे सर्वेक्षण केले होते.
डॉ.सिन्हा यांचे व्याख्यान बीएनसीए व इंटॅक (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अॅण्ड कल्चरल हेरिटेज) पुणे शाखेच्या समन्वयातून हा कार्यक्रम आयोजित केला. डॉ. कमलापूरकर यांनी प्रास्तविक केले. बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप तसेच ‘सांस्कृतिक पर्यटन’ या विषयावर काम करणारे आर्किटेक्ट किरण शिंदे यावेळी उपस्थित होते. अयोध्येबरोबरच वाराणसी, शांतीनिकेतन, वृंदावन, गोवर्धन आणि ताजमहाल या सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असणाऱ्या ठिकाणांवरही डॉ. सिन्हा यांनी सांस्कृतिक क्षेत्राच्या दृष्टीने संशोधनात्मक कार्य केले आहे.
डॉ. सिन्हा पुढे म्हणाल्या की, आधुनिक काळात वाढते शहरीकरण व लोकसंख्येतील वाढ व अतीक्रमणे यांची झळ अयोध्येलाही बसली असून त्याचा तेथील पाणी, जंगल आणि टेकड्यांच्या पर्यावरणावर मोठा परिणाम झाला असल्याचे आमच्या सर्वेक्षणातून अधिक स्पष्ट झाले. अयोध्येतील राममंदिराबरोबरच तेथील राम चबुतरा, सीता रसोई, शरयू नदी, अंगद तिला, हनुमान गढी, रामकोट अशी अनेक पवित्र ठिकाणेही रामकथेच्या धाग्यात गुंफलेली आहेत. तिची भौगोलीक, पर्यावरणीय सद्यस्थिती लक्षात घेता त्यामध्येही मोठे सकारात्मक बदल प्रयत्नपूर्वक घडवून आणले पाहिजेत. नजिकच्या भविष्यात अयोध्या हे जगातील एक महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र बनणार असल्यामुळे तेथील हा संपन्न असणारा सांस्कृतिक वारसाही जाणीवपूर्वक जपला व वाढवला पाहिजे.
त्यासाठी अयोध्येतील या सांस्कृतिक क्षेत्राचेही पुनरुथ्थान होणे गरजेचे आहे, असे सांगून डॉ. सिन्हा म्हणाल्या की, अयोध्येतील शरयू नदीकाठी प्राचिन जलकुंडांची डागडुजी व दुरुस्ती, तिलांजली जलस्रोत परिसरातील पाण्याचे नव्याने व्यवस्थापन, मणीपर्वत व पंचकोशी परिक्रमा येथे देशी वृक्षांचे नव्याने रोपण, रामकोट या प्राचिन किल्ल्याचे संवर्धन, तसेच नव्या वृक्षवाटिकांची निर्मिती हे देशातील व जगभरातील रामभक्तांना अधिक आनंद देऊ शकतील.


