पुणे : तबल्यावर चपखलपणे फिरणारी बोटे, त्यातून निर्माण होणारे नादमय ताल आणि सोबतीला रसिकांची वाहवा अशा तालमय आणि भक्तिरसाने न्हालेल्या वातावरणात ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या सुरेल तबलावादनाने ‘मेलडी रिदम’ कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमाने सद्गुरु श्री जंगली महाराज संगीत महोत्सवाची सांगता झाली.
सद्गुरु श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १३५व्या पुण्यतिथी महोत्सवात पंडित विजय घाटे यांच्या तबलावादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंडित विजय घाटे आणि सहकलाकारांनी सुरेल सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर आणि उत्सव प्रमुख रवींद्र तांबेकर यांच्या हस्ते कलाकारांचे स्वागत करण्यात आले. शिखर नाथ कुरेशी (झेंबे), सुरंजन खंडाळकर (गायन), सागर पटोकर (हार्मोनियम), रोहित ठाकूर (तबला) आणि श्रीनिधी कुलकर्णी (तालवाद्य) यांनी पंडित विजय घाटे यांना कार्यक्रम सादर करताना सुरेख साथसंगत केली.
पंडित विजय घाटे यांनी राग यमनमध्ये मध्य लय तीन तालात “श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, श्रीनाथ नारायण वासुदेव” हे भक्तिगीत सादर करून आपल्या मैफिलीची सुरुवात केली. साथसंगत करणाऱ्या कलाकारांनी सुरेख वादन करून मैफलीत रंग भरला. तबलावादन आणि हार्मोनियम यांची “श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी” या गीतावर झालेली जुगलबंदी रसिकांना नादमय अनुभव देणारी ठरली.
पंडित विजय घाटे म्हणाले, “सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या समाधीसमोर माझी कला सादर करण्याची संधी मला दिली याबद्दल मी देवस्थानचा अत्यंत आभारी आहे. कोणत्याही कलाकाराच्या आयुष्यात अशा प्रकारची संधी ही अत्यंत दुर्मिळ असते. माझ्या कलेमुळेच मला ही संधी लाभली आहे, त्यामुळे मी माझ्या कलेबद्दल कायम कृतज्ञ आहे. रसिक प्रेक्षकांचा देखील मी सदैव ऋणी आहे.”


