Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंविधान शिल्पकार’या महानाटकाने होणार विचार प्रबोधन पर्वाचा समारोप

संविधान शिल्पकार’या महानाटकाने होणार विचार प्रबोधन पर्वाचा समारोप

पिंपरी येथील एच.ए.मैदान येथे आयोजन, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आवाहन

 

 

 

पिंपरी, १५ एप्रिल २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वात बुधवारी (१६ एप्रिल) ‘संविधान शिल्पकार’ या महानाटकाचे सादरीकरण होणार आहे. नागपूर येथील ‘द बोधिसत्व फाऊंडेशन’ संस्था प्रस्तुत हे महानाटक पिंपरी येथील एच.ए.मैदान येथे सायंकाळी पाच वाजता सुरू होईल. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महानाटकाला उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

 

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व २०२५ चे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ११ एप्रिल ते १६ एप्रिल २०२५ याकाळात आयोजन केले आहे. या पर्वामध्ये ११ एप्रिल ते १५ एप्रिल याकाळात झालेल्या सर्वच कार्यक्रमांना पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आता विचार प्रबोधनाचा समारोप महानाटकाने होणार असून त्याची जय्यत तयारी महानगरपालिकेने केली आहे.

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आणि भारताच्या संविधान निर्मितीवर आधारित महासांस्कृतिक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘संविधान शिल्पकार’ या महानाटकात १५० पेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग असणार आहे. या महानाटकात युगनायक फेम सुप्रसिद्ध अभिनेते अथर्व कर्वे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका करत असून माता रमाई यांच्या भूमिकेत विविध पारितोषिक प्राप्त नाट्य व सिने अभिनेत्री सांची जीवने असणार आहेत. अनेक सिने आणि नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्गज कलाकारांचा सहभाग असणाऱ्या या महानाटकाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

 

चौकट

 

ढोल-ताशा पथक रॅप

 

‘संविधान शिल्पकार’ महानाटकाला सुरुवात होण्यापूर्वी एच.ए.मैदानावर लाईव्ह ऑर्केस्ट्रा, गीत आणि नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी रॅपर विपीन ताथड यांचे ढोल-ताशा पथक हे रॅप सादर करणार आहेत. नागरिकांना ढोल-ताशाच्या निनादातील हा अनोखा रॅप पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments