Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedआपण खऱ्या अर्थाने आजही धर्मनिरपेक्ष झालो नाही राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे...

आपण खऱ्या अर्थाने आजही धर्मनिरपेक्ष झालो नाही राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे ; ‘लोकपरंपरा पुरस्कार’ शिवाजीराव गोपाळे यांना प्रदान शनिवार पेठेतील वीर मारुती मंदिर : ‘वीर’ परंपरेच्या जतनासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मान

पुणे : आपण खऱ्या अर्थाने आजही धर्मनिरपेक्ष झालो नाही. शिक्षा आणि पुरस्कार हे धर्म बघूनच दिले जातात. मणिपूर मध्ये हिंसाचार झाला तेव्हा अनेक जण बोलत होते परंतु आज पश्चिम बंगाल मधल्या हिंसाचाराबद्दल ते लोक बोलत नाहीत. मुस्लिम मेले तर संविधान संकटात येते हिंदू मेले तर येत नाही का? , असे मत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केली.

 

शनिवार पेठेतील वीर मारुती चौक येथे पेशवे काळापासून सुरू असलेली आणि आजही अखंडपणे जपली जाणारी कीर्तन परंपरा यंदाही हनुमान जयंतीपासून अक्षयतृतीया पर्यंत सलग १८ दिवस साजरी होत आहे. महाराष्ट्रातील सलग १८ दिवस कीर्तन उत्सव सुरु असणारे हे बहुधा एकमेव मारुती मंदिर मानले जाते.

 

‘शनिवार वीर मारुती उत्सव मंडळा’च्या पुढाकाराने आणि गुरुवर्य श्री श्रीराम धोंडूराम दहाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘लोकपरंपरा पुरस्कार’ शिवाजीराव गोपाळे यांना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे यांच्या हस्ते शनिवार पेठेतील वीर मारुती चौक येथे प्रदान करण्यात आला. यावेळी राम दहाड, महेश पानसे, सचिन दाते, मयुरेश जोशी, प्रवीण जोशी व सहकारी मंडळी उपस्थित होते.

 

ह. भ. प. चारुदत्त बुवा आफळे म्हणाले, पानिपतचे युद्ध मराठ्यांनी जिंकावे यासाठी मारुतीला नवस करण्यात आला. ज्या ज्या वीरांच्या कुटुंबीयांनी नवस केला ते शनिवार पेठेतील मंदिरात आजही येतात. अशा वीरांच्या कुटुंबाचे संकलन शिवाजीराव गोपाळे यांनी केले, त्यांचे काम मोठे आहे. तब्बल २५ वर्षापेक्षा जास्त काळ ते झटले आणि २०० सरदारांची नावे पुढच्या पिढीपर्यंत दिली, अशा तपोवृद्ध माणसाचा सन्मान करायला मिळणे हा आमचा सन्मान आहे, अशी भावना आफळे यांनी व्यक्त केली.

 

राम दहाड म्हणाले, कीर्तन उत्सवाच्या या पावन परंपरेत चारुदत्त बुवा आफळे, वासुदेव बुवा बुरसे, मकरंद बुवा दीक्षित यांसारख्या नामवंत कीर्तनकारांनी सहभाग घेतला असून, आजही ही परंपरा अखंड सुरू आहे. हा उत्सव कोणतीही वर्गणी न घेता, लोकवर्गणीतून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या परंपरांना जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना ‘लोकपरंपरा पुरस्कार’ देण्यात येतो.

 

ही परंपरा अधिक जिवंत राहावी म्हणून राम दहाड, महेश पानसे, सचिन दाते, मयुरेश जोशी, प्रवीण जोशी व सहकारी मंडळी ही उत्साहाने प्रयत्नशील आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments