पुणे,24 एप्रिल 2025 : पुण्यातील एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने सहयोग केला असून मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांमध्ये रेटिनोपॅथी ऑफ प्री-मॅच्युरिटी या गंभीर स्थितीचे निदान करण्यासाठी एक नवीन एआय अल्गोरिदमवर अभ्यास सुरू आहे. हा अभ्यास 2018 साली सुरू झाला असून पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. विविध टप्प्यात सुरू असलेल्या या अभ्यासामधील नवीनतम भाग फेब्रुवारी 2025 मध्ये मेथड एक्स या शास्त्रीय नियतकालिकेत प्रकाशित झाला आहे. या संशोधनाचे नेतृत्व एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ.सुचेता कुलकर्णी आणि एमआयटीडब्ल्यूपीयू मधील प्राध्यापिका व एआय तज्ञ डॉ.रंजना अग्रवाल करत आहेत.
रेटिनोपॅथी ऑफ प्री-मॅच्युरिटी (आरओपी) ही मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांच्या डोळ्यांची एक गंभीर स्थिती आहे.जर याचे लवकर निदान झाले नाही तर कायमचे अंधत्व येऊ शकते.ही स्थिती 34 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या आणि 2000 ग्रॅम पेक्षा कमी वजनाच्या नवजात शिशुंमध्ये दिसून येते.यावर जर उपचार घेतले नाहीत तर,डोळ्याचा पडदा (रेटिना) हा आजूबाजूच्या उतींपासून दूर जातो (रेटिनल डिटॅचमेंट). यामुळे दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो किंवा अंधत्व येऊ शकते.
एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ.सुचेता कुलकर्णी म्हणाल्या की, मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांच्या डोळ्यांच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅमेरामध्ये आम्ही ही एआय आधारित ऑटोमेटेड सिस्टीम अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. निदान करताना कॅमेराचा वापर डोळ्याच्या पडद्यामध्ये तयार झालेल्या रक्तवाहिन्या, डोळ्यांमधून मेंदूकडे जाणाऱ्या नसा इत्यादींची तपासणीसाठी केला जातो. साधारणत: अशा बाळांमधील 10 टक्के बाळांना आरओपी या स्थितीसाठी उपचारांची गरज भासते.परंतु 90 टक्के बाळांना उपचाराची गरज लागत नाही.त्यामुळेच एआय टूल कॅमेऱ्यामध्ये अंर्तभूत करता आल्यास निदानाची प्रक्रिया विशेष करून दुर्गम भागात टेक्निशियन्सकडून होऊ शकते आणि डॉक्टर्स जास्त वेळ हा आरओपी बाबत उपचाराची गरज असलेल्या व गुंतागुंतीची स्थिती असलेल्या रूग्णांसाठी देऊ शकतात.याचे कारण आरओपीच्या उपचारांबाबत सद्यस्थितीमध्ये डॉक्टरांचे प्रमाण खूप कमी आहे.
डॉ.सुचेता कुलकर्णी म्हणाल्या की,या संपूर्ण अभ्यास व प्रक्रियेला आणखी दोन वर्षे लागतील.परंतु यामुळे आरओपी सारख्या गंभीर स्थितीच्या निदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये परिवर्तन घडू शकेल.आमच्या प्राथमिक टप्प्यातील अभ्यासामध्ये आम्हाला असे जाणवले आहे की,हे एआय टूल सुमारे 95 टक्के अचूकतेने आरओपी या स्थितीचे निदान करू शकेल. हा अभ्यास यशस्वी झाल्यास उपचाराची गरज असलेली बालके आणि आरओपी तज्ञ यांच्यातील दरी भरून काढण्यास मदत होईल. विशेष करून ग्रामीण भागात याचा खूप जास्त फायदा होईल,कारण अशा प्रकारच्या स्थितीचे निदान हे जन्मानंतर पहिल्या महिन्यात करणे गरजेचे असते.
एमआयटीडब्ल्यूपीयू मधील प्राध्यापिका व एआय तज्ञ डॉ.रंजना अग्रवाल म्हणाल्या की,सध्या आम्ही रेटिनोपॅथी ऑफ प्री-मॅच्युरिटीच्या निदान प्रक्रियेतून मिळालेला माहितीसाठा आणि डॉक्टरांकडून प्राप्त झालेल्या वैद्यकीय माहितीनुसार काम करत असून यामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता अंर्तभूत करून आरओपी निदान प्रक्रिया आणखी सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहोत. एआय टूलचे कॅमेऱ्यांमध्ये एकत्रीकरण करण्याचे आणि त्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे आमचे काम सुरू आहे.एकदा सॉफ्टवेअर तयार झाले की,आम्ही कॅमराची निर्मिती करणाऱ्या कंपनीसोबत सहकार्य करू.या अभ्यासाला आणखी सुमारे 2 ते 3 वर्षे लागतील,कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर माहिती साठ्यावर काम करण्याची गरज आहे.या माहिती साठ्यामध्ये फक्त डोळ्यांची प्रतिमाच नव्हे तर,हा आजार कुठल्या टप्प्यात आहे,हे देखील महत्त्वाचे आहे आणि त्याची माहिती डॉक्टरांकडून प्राप्त करावी लागते.त्याशिवाय मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांपैकी 10 टक्के बाळांना हा आजार असण्याची शक्यता असल्याने माहितीसाठ्याचे वर्गीकरण करावे लागते.याशिवाय प्रत्येक बाबतीत डॉक्टरांकडून सूचना,निदानानंतरचे त्यावरील विश्लेषण हे देखील महत्त्वाचे असते.या प्रक्रियेला वेळ लागतो.आजवर आरओपी आजाराच्या निदानासाठी केल्या गेलेल्या प्रक्रियेमधून 1000 प्रतिमा आम्ही प्राप्त केल्या आहेत.परंतु एआय मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी हा माहितीसाठा अधिक व्यापक लागेल. कृत्रिम बुध्दिमत्तेमध्ये काम करताना डीप लर्निंगपासून आम्ही सुरू केले पण आता सध्या एआय चा अद्ययावत प्रकार असलेल्या जनरेटिव्ह एआयचा आम्ही वापर करत आहोत.
डॉ.सुचेता कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, हा अभ्यास आणि प्रक्रिया थोडी क्लिष्ट वेळ लागणारी आहे,मात्र एकदा अभ्यास पूर्ण झाल्यावर डॉक्टरांचा वेळ वाचवून अधिक गुंतागुंतीच्या स्थितींवर त्यांना लक्ष केंद्रित करता येईल.याचे कारण सध्या आरओपीचे प्रमाण वाढत असून तेवढ्या प्रमाणात डॉक्टर उपलब्ध नाहीत.
त्या म्हणाल्या की,वेळेवर निदान आणि उपचार केल्यास अंधत्व टळू शकते.सर्व मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांचे आरओपीसाठी पहिल्या चार आठवड्यात निदान होणे गरजेचे आहे.जर आरओपी आजार असल्याचे निदान झाले तर लेझर थेरपी किंवा इंजेक्शन्सचा वापर
केला जातो.


