सर्वसाधारणपणे मार्च, एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे मृत्यूही होऊ शकतात. उष्माघाताने मृत्यु होऊ नये यासाठी आपण जागरुक राहीले पाहीजे. त्याकरिता प्रामुख्याने खालील गोष्टींबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
अतिजोखमीचे घटक :-
१) ६५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती
२) १ वर्षांखालील व १ ते ५ वयोगटातील मुले
३) गरोदर माता
४) मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती
५) अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याऱ्या व्यक्ती
उष्माघात होण्याची कारणे-
१ ) उन्हाळयामध्ये मजुरीची कामे फार वेळ करणे,
२) कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे.
३) जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे. (जसे बेकरी, भेळीच्या भट्टया, विटभट्टी)
४) घट्ट कपड्यांचा वापर करणे
अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
लक्षणे-
१) थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
२) भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे अथवा गोळे येणे
३) रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी.
प्रतिबंधात्मक उपाय :-
हे करावे-
१) वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे.
२) कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत.
३) उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत. सैल, पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
४) जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे (तहान लागली नसेल तरीही).
५) सरबत प्यावे, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
६) अधूनमधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी.
७) वर नमूद केलेली लक्षणे आढळल्यास ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व डॉक्टराच्या सल्ल्याने उपचार सुरु करावा
८) उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवल, फेटा, उपरणे, छत्री इ.चा वापर करावा.
९) घरे थंड ठेवण्यासाठी पंखे, कुलर यांचा वापर करण्यात यावा, तसेच वाळयाचे किंवा सुती ओले पडदे व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या / झरोके उघड्या ठेवण्यात याव्यात.
१०) कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. शक्य असल्यास माठ वापरावा,
११) कामाच्या ठिकाणी शक्य असल्यास सावली करून थेट सूर्यप्रकाशाचा संबंध टाळावा,
१२) गरोदर माता, मधुमेह व हृदयविकार असलेले कामगार यांची जास्त काळजी घेण्यात यावी.
ब) हे करु नये-
१) लहान मुले किवा पाळीव प्राण्याना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. तसेच
२) दारे, खिडक्या बंद करून ठेऊ नये.
३) दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीमध्ये उन्हात जाणे टाळावे.
४) गडद रंगाचे, घटट्ट, जाड कपडे, व कृत्रीम घालण्याचे टाळावे.
५) तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे दु. १२.०० ते ३.३० या कालावधीमध्ये टाळावीत
उपचार
१) रुग्णास वातानुकुलीत खोलीत अथवा हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत,
२) रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
३) रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी.
४) रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टटया ठेवाव्यात, आईस पॅक लावावेत.
५) आश्यकते नुसार सलाईन द्यावे.
उष्माघाताच्या रुग्णावर उपचार करण्याकरिता आवश्यक औषधोपचार व प्रशिक्षित मनुष्यबळ पिंपरी चिंचवड मनपाच्या सर्व रूग्णालयामध्ये उपलब्ध आहे याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. नागरिकांनी उपरोक्त नमूद लक्षणे आढळून आल्यास त्वरित पिंपरी चिंचवड मनपाच्या रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(डॉ. लक्ष्मण गोफणे)
आरोग्य वैद्यकीय अधिकारी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका


