पुणे, दिनांक २६ एप्रिल ः सद्यस्थितीत आपल्याला गरजांपेक्षा अपेक्षांचे ओझे वाढल्याने जगण्यात एक साचलेपण आले आहे. परंतु महाकुंभाच्या अनुभवातून जगण्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळाली, अशी भावना मी अनुभवलेला महाकुंभ या लेख स्पर्धेच्या विजेत्यांनी व्यक्त केली.
पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित ‘मी अनुभवलेला महाकुंभ’लेख स्पर्धेचे बक्षिस वितरण शनिवारी (ता.२६) पार पडले. सदाशीव पेठेतील भारतीय विचार साधना सभागृहात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन आणि विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह नितीन देशपांडे उपस्थित होते. वयवर्षे ५० पेक्षा कमी असलेल्या लेख स्पर्धा गटात दीपिका तांबेकर यांना प्रथम, काव्या दीक्षित यांच्या लेखाला द्वितीय क्रमांक तर हृषीकेश कापरे यांच्या लेखाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तर वयवर्ष ५० पेक्षा अधिक असलेल्या गटात प्रथम क्रमांकावर विद्या काशिद यांनी मोहर उमटवली, द्वितीय क्रमांकावर अतुल गोखले आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस भास्कर कुलकर्णी यांना मिळाले.
कार्यवाह देशपांडे यांनी विश्व संवाद केंद्र आणि लेख स्पर्धेसंबंधी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “राष्ट्रीय विचारांच्या प्रसारासाठी विश्व संवाद केंद्रे देशभरात कार्यरत आहे. महाकुंभाच्या निमित्ताने लेखकांचा अनुभव शब्दबद्ध व्हावा आणि त्यातून विचारांचे नवनित निर्माण व्हावे, हाच प्रयत्न होता.” केंद्राच्या स्तंभलेखक आयामाबद्दल डॉ. अपर्णा लळिंगकर यांनी माहिती दिली.
प्रतिभा चंद्रन यांनी माध्यमांच्या भूमिकेतून महाकुंभाचा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, “महाकुंभासाठी प्राथमिक सुविधांचा विस्तार, सुरक्षा, दळवळण आणि अन्नपुरवठा यासाठी मिशन मोडवर काम करणारे प्रशासन आम्हाला पाहायला मिळाले. आत्मियता आणि समर्पणाच्या भावातूनच महाकुंभ यशस्वी करण्यात आला आहे. व्यवस्थात्मक पातळीवर महाकुंभाचे आयोजन भव्य दिव्य होते. भारतच असे आयोजन यशस्वीपणे करू शकतो याची प्रचिती आली.” स्पर्धेचे परीक्षण प्रा. अनघा काळे, ऋचा थत्ते, अपर्णा परांजपे यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता काजळे, आभार सुमध बागाईतकर तर राधा जोशी यांनी पसायदान म्हटले.


