आजही कित्येक कवींना
मराठीतील पहिली कवयित्री
म्हदाईसा आहे,हे माहिती नाही.त्यामुळे ही माहिती व्हावी तसेच म्हदाईसा चे मराठी कवितेवर आलेले ऋण लक्षात घेऊन यापुढे प्रत्येक
कवी संमेलनाची सुरुवात ही
म्हदाईसा च्या स्मरणाने झाली आली पाहिजे, अशी अपेक्षा माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांनी केली.ते
आंतरराष्ट्रीय साहित्य कला मंच_ न्यूयॉर्क,महाराष्ट्र मंडळ_
न्यूयॉर्क,जीवन गौरव परिषद_
महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने,महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन कवी संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
श्री भुजबळ पुढे म्हणाले की,
म्हदाईसाने इ. स. १२८८ पूर्वीच्या ढवळे या काव्य
प्रकारातून कृष्णभक्ती आणि तत्कालीन यादव काळातील विवाहाचे वर्णन केले आहे. तसेच तिची मात्रुकी रुक्मिणी स्वयंवर ही दुसरी काव्य रचना प्रसिद्ध आहे.
या कवी संमेलनाच्या प्रारंभी
महाराष्ट्र मंडळ_न्यूयॉर्क चे
अध्यक्ष श्री शिरीष,
जीवन गौरव परिषद चे प्रमुख
श्री गणेश कुंभारे यांनी आपापली मनोगते व्यक्त केल्यावर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या देश वासियांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कवी संमेलनास सुरुवात झाली.
कवितांची २ हजार सादरीकरण केलेले ज्येष्ठ कवी
अरुण म्हात्रे यांनी कवितेविषयीचे समर्पक भाष्य करून स्वतःची
” हे कुठले रस्ते
तुडवित जातो….”
ही कविता सादर केली.
न्यूयॉर्क स्थित पण मूळ मुंबईकर असलेले संजय गोखले यांनी,
” तू चालतच रहा रे गड्या,
” तू चालतच रहा….”
ही प्रेरणादायी कविता सादर केली.
यवतमाळ येथील मुख्याध्यापिका ,कवयित्री कल्याणी महादेश्वर यांनी आजच्या जाहिरात युगाचे
सार्थ ,विडंबनात्मक
महात्म्य त्यांच्या
” अरे अरे भाऊ
मागे नको राहू,
खपवायचा असेल माल
तर जाहिरात कर पाहू”
या कवितेतून सादर करून
कवी संमेलनात चांगलीच बहार आणली.
आपल्या दैनंदिन जीवनात मदत करणाऱ्या असंख्य व्यक्ती असतात. पण आपण त्यांची जाण ठेवीत नाही.कवयित्री अर्चना निगळे यांनी मात्र त्यांच्या
” मी सूर्य पाहण्यासाठी
त्यांनी अंधार वाहिला होता”
ही कृतज्ञता व्यक्त करणारी कविता सादर केली.
नागपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक रविंद्र निमोणकर यांनी भारतातील सद्य स्थितीचे भान ठेवून
” भारत माझा देश आहे
जन्मा येण्या या भू वरी
देवही प्रतिक्षेत आहे…”
ही देशभक्ती पर कविता सादर करून काही काळ सर्वांना स्तब्ध केले.
अमरावतीच्या घनदाट मेळघाट
अरण्यातून सहभागी होत
निवृत्त बँक अधिकारी सुरेश अकोटकर यांनी विदर्भातील
शेतकऱ्याचे दुःख मांडणारी,
” कृषका,तुझ्या लक्ष्मीला
एकच सांगणे…” ही आर्त कविता सादर केली.
तर देवेंद्र भुजबळ यांनी थोर कवी मंगेश पाडगांवकर यांच्या
“सरणारे वर्ष मी….” या कवितेवर केलेली “मरणारे वर्ष मी…” ही विडंबनपर कविता सादर करून सर्वांना अंतर्मुख केले.
या शिवाय अभियंता प्रसाद देशपांडे,पुणे, वर्षा प्रभुगावकर,गोवा,पौर्णिमा कदम,न्यूयॉर्क, डॉ बाळासाहेब लबडे,स्वाती वर्तक,मुंबई, डॉ प्रल्हाद हरिणखेडे, भूलतद्न्य डॉ तानिया शेटे, गडचिरोली ची तरुण कवयित्री विधी बनसोड,
शेतकरी कवी आबासाहेब बनसोड, वॉशिंग्टन येथील
कवयित्री सुषमा येरवाडकर,
नयना निगळे आदींनी या दोन तास चाललेल्या,संपूच नये असे वाटणाऱ्या कवी संमेलनात आपापल्या कविता सादर केल्या.
कवी संमेलनाचे बहारदार सूत्र
संचालन ,या कवी संमेलनाच्या आयोजक नयना निगळे यांनी केली. या कवी संमेलनाला
मिळालेला प्रतिसाद पाहून आपला हुरूप चांगलाच वाढल्याचे सांगून पुढेही असे
कवी संमेलन आयोजित करण्यात येईल,असे जाहीर केले.
फेसबुक लाईव्ह च्या
माध्यमातून सहभागी झालेल्या असंख्य रसिकांना उच्च कोटीचा आनंद दिला.


