नाशिक,5 फेब्रुवारी 2024 : सलाम मुुंंबई फाऊंडेशन (एसएमएफ) ने एव्हरेस्ट फाऊंडेशनच्या सहयोगाने नाशिकमध्ये नुकतेच चौथ्या बालपरिषदेचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनावर आणि समुदायावर परिणाम करणार्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील 170 हून अधिक विद्यार्थ्यांना एकत्र आणले.कार्यक्रमादरम्यान प्रतिष्ठित तज्ञांच्या पॅनेल ने विद्यार्थ्यांशी तंबाखू संबंधित समस्यांवर संवाद साधला.या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना त्यांचे मत मांडण्यासाठी आणि अर्थपूर्ण उपाय शोधून योगदान देण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
2015 पासून नाशिकमध्ये विविध उपक्रमांद्वारे सलाम मुंबई फाऊंडेशनने एव्हरेस्ट फाऊंडेशनच्या साहाय्याने युवा विद्यार्थ्यांसाठी तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन आपले ज्ञान वर्गापलीकडे नेऊन आरोग्यदायी जीवनपध्दतीबाबत जागरूकता निर्माण करत समुदायामध्ये तंबाखू मुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.त्यातील एक उदाहरण म्हणजे येवला येथील इयत्ता चौथीत शिकणार्या एका विद्यार्थिनीचे तिच्या आईला तंबाखूचे व्यसन होते.एक दिवस ही विद्यार्थिनी सलाम मुंबई फाऊंडेशनच्या जागरूकता कार्यक्रमात सहभागी झाली आणि तिथे तिला तंबाखूच्या गंभीर दुष्परिणामाबाबत माहिती मिळाली.ही माहिती आपल्या आईपर्यंत पोहचावी असे तिला वाटले.एका सकारात्मक दृष्टीकोनाने तिने आईला सांगितले की,तु कायम माझ्यासोबत असावी,असे मला वाटते,पण तुला माझ्यापासून दूर नेण्याची ताकद या तंबाखूमध्ये आहे.तिच्या या बोलण्याचा आईवर प्रचंड प्रभाव पडला आणि त्यांनी हे व्यसन सोडून देण्याचा निर्धार केला मात्र ही विद्यार्थिनी येथेच थांबली नाही,तिने तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत कुटुंबातील इतर सदस्यांना देखील माहिती दिली आणि सर्वांची सवय सोडून देण्यास पटवून दिले.आता ही विद्यार्थिनी गावातील इतरांसाठी आशेचा किरण बनली आहे.आपल्या कुटुंबाला ज्या प्रेमाने आणि काळजीने तंबाखू सोडण्याचा संदेश दिला तो संदेश ती इतरांमध्ये देखील पसरवत आहे.
खाजगी शाळांमधील मॉडेल युनायटेड नेशन्स (एमयुएन) प्रमाणे असलेल्या बालपरिषदेला अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारगुडे हे उपस्थित होते.त्यांच्यासह नाशिकच्या शिक्षण विभागाचे क्षेत्रीय उपसंचालक बी.बी.चव्हाण यांनी उद्घाटन समारंभात भाषण केले.चर्चासत्रामध्ये सहभागी मान्यवरांमध्ये अन्न व औषध प्रशासन नाशिक चे सहआयुक्त उदय लोहकरे,शिक्षण अधिकारी डॉ.नितीन बच्चाव,सिव्हील सर्जन डॉ.चारूदत्त शिंदे,लोकसत्तामधील वरिष्ठ पत्रकार चारूशिला कुलकर्णी,एव्हरेस्ट इंडस्ट्रीज लि.मुंबईच्या कॉर्पोरेट अफेअर्स विभागाच्या प्रमुख स्मिथा पद्मनामभन नायर आणि एव्हरेस्ट इंडस्ट्रीज लखमापूर,नाशिक चे प्रकल्प प्रमुख रमेश कोमाकुलकर यांचा समावेश होता.
याप्रसंगी बोलताना एव्हरेस्ट इंडस्ट्रीज लि.च्या सीएसआर विभागाच्या प्रमुख मीनाक्षी डे म्हणाल्या की, तंबाखू सेवन हा एक धोकादायक पर्याय आहे आणि त्याचा वापर रोखण्यासाठी आपण एकत्र येणे आवश्यक आहे. समाजात जागरूकता वाढवून मानसिकता बदलण्याची आणि तंबाखूमुक्त संस्कृती जोपासण्याची आपल्यामध्ये ताकद आहे. गेली 9 वर्षे एव्हरेस्ट फाऊंडेशन ही संस्था सलाम मुंबई फाऊंडेशनच्या सहकार्याने तंबाखूच्या हानिकारक परिणामांबद्दल प्रबोधन करण्यासाठी नाशिकमध्ये प्रयत्न करत आहे.आमच्या संयुक्त प्रयत्नांनी 9 ब्लॉक्समधील शाळांना तंबाखूमुक्त क्षेत्रांमध्ये यशस्वीरित्या परिवर्तित केले आहे.आणि आमच्या कार्यक्रमाचा प्रभाव दहेज आणि कटनी या क्षेत्रात देखील विस्तारत आहे.या प्रयत्नांमध्ये सक्रीय सहभाग घेणारे विद्यार्थ्यांचे प्रयत्न हे आरोग्यदायी,तंबाखूमुक्त भविष्य घडविण्यात मोलाचे योगदान देत असून त्यांचे कौतुक आहे.
सलाम मुंबई फाऊंडेशनच्या विश्वस्त राजश्री कदम म्हणाल्या की,बालपरिषदेच्या माध्यमातून भारताच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्यांची मते व समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.ही तरूण मने एकत्र येतात आणि समाजाला भेडसावणार्या विशेष करून तंबाखू सेवनाच्या मुद्दयांवर अर्थपूर्ण चर्चा करताना पाहणे खूप आनंददायी आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्याशी भागीदारी केल्याबद्दल एव्हरेस्ट फाऊंडेशनचे आम्ही कृतज्ञ आहोत.आम्हाला आशा आहे की,हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या समुदायात बदल घडवून आणण्यासाठी सक्षम करेल.


