Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedविनोदाचा पंचरंगी वाचनीय खजिना

विनोदाचा पंचरंगी वाचनीय खजिना

वाचकांन सु. ल. खुटवड हे नाव विनोदी साहित्याबरोबरच ‘सकाळ’ मधील विविध विनोदी स्तंभलेखनामुळे चांगलेच परिचित आहे. त्यांनी ‘पंच’नामा नावाचे सदर सलग तीन वर्षे दररोज लिहिले. वाचकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक लेखांचे पुनर्लेखन केलेले विस्तारित लिखाण म्हणजे नस्ती ‘पंचा’ईत, जनूभाऊ, कागदी घोडे, हास्याची ‘लाट’ आणि विनोदाचं गुऱ्हाळ ही पाच पुस्तके होय.
‘पंच’नामाच्या या पाच पुस्तकांतून त्यांनी विनोदाचा पंचरंगी वाचनीय खजिना वाचकांसमोर खुला केला आहे. प्रसंगनिष्ठ विनोद, खटकेबाज संवाद, नाट्यपूर्ण घडामोडी, ओघवती आणि चुरचुरीत शैली ही या पाचही पुस्तकांची वैशिष्ट्ये आहेत. त्याचबरोबर उपहास आणि उपरोधाची मुक्तहस्ते उधळण यामधून जाणवते.
नियमित स्तंभ लेखन करणे हीच गोष्ट लेखकाची परीक्षा पाहणारी असते. त्यात विनोद निर्माण करणारे लेखन करणे हे तर कसोटीचेच असते. कारण विनोद दुर्मिळ असतो आणि तो सतत घडावा, यासाठी अट्टहास केला तर अतिपरिचयात अवज्ञा होण्याची फार मोठी शक्यता असते. सु. ल. खुटवड यांनी सातत्याने हलक्या फुलक्या खुसखुशीत शैलीत मध्यमवर्गीय माणसांच्या जगण्याचा ‘पंच’नामा करणारे विनोदी लेखन केले. मात्र, त्यांच्या लेखनात कुठेही तोचतोपणा जाणवत नाही. विषयांचे वैविध्य, सातत्य आणि विनोद निर्मितीतला दर्जा राखल्यामुळे त्यांचे लेखन कमालीचे वाचनीय झाले आहे.
सातत्याने विनोदी लेखन करणे ही तशी जोखमीची गोष्ट असते. अशा प्रकारच्या लेखनासाठी त्या लेखकाकडे खिलाडूवृत्ती आणि जीवनातील विसंगतीकडे दयाबुद्धीने पाहण्याची मानसिकता असावी लागते. मानवी स्वभाव वैशिष्ट्यांचे निरनिराळे नमुने अभ्यासण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण शक्ती असावी लागते. मानवी वर्तन व्यवहारांचा अभ्यास असावा लागतो. त्याच्या जोडीला भाषेवरती प्रभुत्व असावे लागते तरच विनोद निर्मितीसाठी भाषेशी खेळता येते. ही सारी गुणसंपदा खुटवड यांच्याकडे असल्यामुळे त्यांचे विनोदी लेखन कसदार झाले आहे.

‘नस्ती ‘पंचा’ईत’ ः निवडक ‘पंच’नामा या मालिकेतील पहिल्या भागात त्यांनी कुटुंबात विशेषत: नवरा-बायको, सासू-सासरे, सून-मुले यांच्या वागण्या बोलण्यातून घडणाऱ्या गमती जमती त्यांच्या खास शैलीत सांगितल्या आहेत. छोट्या छोट्या प्रसंगात अपेक्षाभंगातून घडणाऱ्या अफलातून विनोदाचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो. दैनंदिन जीवनात माया आणि प्रेम जपणाऱ्या कुटुंबात छोट्या छोट्या कुरबुरीही होत असतात. बोलायचे एक असते, प्रत्यक्षात बोलले वेगळेच जाते आणि ते बोलणे ऐकणाऱ्याने त्याचा तिसराच अर्थ काढलेला असतो. त्यामुळे घोटाळे होतात. रुसवे फुगवे होतात. ते दूर करताना जो तो आपली भूमिका मांडतो आणि आपले वागणे कसे योग्य आहे हे पटवून देण्यासाठी अनेक युक्त्या करतो. त्यातून गमती घडतात. त्या या पुस्तकात वाचताना मानवी स्वभाव वैशिष्ट्यांचे अनेक पैलू खुटवड यांच्या खुसखुशीत शैलीतून उलगडतात.

जनूभाऊ : सु. ल. खुटवड यांनी जनूभाऊ ही अस्सल पुणेकराची अफलातून व्यक्तिरेखा उभी केली आहे. पूर्वी असे गमतीने म्हटले जात असे की ‘पुण्यातल्या प्रत्येक घरात एक सायकल आणि स्वतःचे ठाम मत असलेला एक समीक्षक असायचा.’ कोणत्याही गोष्टीवर मत प्रदर्शित करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि न पटणाऱ्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवण्याचा आपला अधिकार आपण बजावलाच पाहिजे, अशी ठाम समजूत असलेली माणसे समाजजीवनात अनेकदा दिसतात. जनूभाऊ या व्यक्तीरेखेत अशा मंडळींचे प्रातिनिधिक रुप दिसते. ‘किमान शब्दात कमाल अपमान’ करण्यात वाकबगार असणारे जनूभाऊ सरकारी कार्यालये, बँका, पोलिस खाते, दुकाने, पीएमटी बस, रिक्षा, सार्वजनिक ठिकाणे, गणेशोत्सव, सहकारी गृहनिर्माण सोसायटी अशा ठिकाणी आपला बोलण्याचा आणि मतप्रदर्शनाचा अधिकार ठामपणे बजावत आपला ठसा उमटवीत असतात. त्यांच्या कृतीमुळे घडणारे गमतीशीर प्रसंग या पुस्तकात खुटवड यांनी आपल्या खास शैलीत रंगविले आहेत. अस्सल पुणेकर कसा असतो, हे अनुभवण्यासाठी या पुस्तकातील जनूभाऊंची भेट घ्यायलाच हवी.

कागदी घोडे : विविध सरकारी कार्यालये, बँका, महापालिका, पोलिस ठाणे. महावितरण, सरकारी रुग्णालये या ठिकाणी कागदी घोडे नाचवून अटी आणि नियम यांचा बागुलबुवा उभा करून सर्वसामान्य व्यक्तींना नेहमीच त्रास त्रास दिला जातो. कोणत्याही सरकारी कार्यालयात सर्वसामान्य माणसांना येणारा अनुभव कधीच सुखद नसतो. दिरंगाई हेच व्यवच्छेदक लक्षण असलेल्या या कार्यालयात सामान्य माणसांच्या संयमाची कायमच परीक्षा घेतली जाते. त्यामुळे माणसांचा अनेकदा तिळपापड होतो पण त्यामुळे प्रश्न सुटत नाहीत. केवळ मन:स्ताप होतो. कागदी घोड्यांच्या अडून, अटी आणि नियम यांचा बागुलबुवा उभा करून जो त्रास दिला जातो, टेबलावरचे काम व्हावे यासाठी टेबलाखालून काहीतरी मिळावे अशी अपेक्षा ठेवली जाते. या सामान्य माणसांना येणाऱ्या अनुभवांविषयी विषयी उपहास, उपरोध आणि अतिशयोक्तीचा वापर करत खुटवड यांनी जे लेखन केले आहे ते सरकारी कार्यालयाच्या अशा त्रासदायक प्रसंगातही सामान्य माणसांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे आहे.
हास्याची ‘लाट’ : कोरोनाचा संकटकाळ जगाची सत्वपरीक्षा पाहून गेला. माणसांच्या जगण्यावागण्याचे सगळे संदर्भ या काळात बदलून गेले. मुखपट्टी नावाचा नवा दागिना माणसांना मिळाला. सॅनिटायझरला एखाद्या तीर्थाचे महत्त्व प्राप्त झाले. शिंक आणि खोकला या ऐरवी साधारण वाटणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियांविषयी सर्वांनाच भीती वाटायला लागली. हस्तांदोलन आणि आलिंगन या प्रेमाने करावयाच्या गोष्टींविषयी घृणा वाटायला लागली. माणसा माणसातील भौतिक अंतर वाढले. हा अनुभव पहिल्यांदाच वाट्याला येत असल्यामुळे नेमके कसे वागायचे आणि या संकटाला कसे सामोरे जायचे याविषयी सर्वांच्या मनात शंका होत्या. त्यामुळे प्रशासन आणि सामान्य माणसे या सर्वांनाच अनेकदा ‘प्रयोगातून अज्ञानाकडे’ वाटचाल करावी लागली त्यानिमित्ताने या गंभीर प्रसंगातही अनेक गमती जमती घडल्या. पुरुषांना स्वयंपाक करणे, भांडी धुणी करणे, या आपल्या अंगी असलेल्या सुप्त कौशल्यांचा शोध लागला. त्याचा बायकांनी चांगलाच उपयोग करून घेतला. टाळेबंदीतला प्रत्येक दिवस रोज नवे आव्हान घेऊन येत होता तसाच नव्या विनोदालाही जन्म देत होता. दिमाखात होणारे विवाह सोहळे २५-३० लोकांच्या उपस्थितीत साजरे करावे लागले. परिस्थिती कशी ही असली तरी माणसे मात्र बदलत नाहीत याचेच प्रत्यंतर या काळात आले. मद्यालयासमोर भल्या मोठ्या रांगा लागल्या. मानवी स्वभावाचे विविध नमुने पोलिस, विविध सरकारी खात्यासह आरोग्य विभागाच्या कामकाजाची पद्धत, सार्वजनिक जीवनातील विसंगती, नवरा बायको मधील गमती जमती यामुळे या कठीण काळात हास्याच्या लाटा उसळत राहिल्या त्याचे चित्रण ‘हास्याची लाट’ या पुस्तकात आहे.

विनोदाचं गुऱ्हाळ : या पुस्तकात कुटुंबातील आणि सार्वजनिक जीवनातील गमती जमती आहेत. एखाद्या समारंभात पाहुण्यांचा परिचय करून देणारी व्यक्ती गौरव करण्याच्या नादात बोलण्यातून त्या पाहुण्यांचेच वस्त्रहरण करते. डॉक्टर-रुग्णांच्या संवादातही बोलण्याचे पथ्य न पाळल्यामुळे भलतेच अर्थ निघतात. दैनंदिन जीवनात काही वेळा अनपेक्षितपणे फजिती होते. तर काही वेळा ती ठरवून केली जाते यातून निर्माण होतो तो फक्त विनोद आणि हास्य. असे धमाल प्रसंग आणि त्यातून घडलेले विनोद विनोदाचे गुऱ्हाळ या पुस्तकात आहेत.
शब्दनिष्ठ, प्रसंगनिष्ठ आणि कोटीबाज अशा सर्व प्रकारच्या विनोदांचा सुखद शिडकावा खुटवड यांच्या लेखनात आहे. चिमटा तर काढायचा पण ओरखडा, व्रण तर दिसणार नाही याची काळजी घ्यायची यासाठी विनोदकाराला लागणारे सगळे कसब त्यांच्याकडे आहे. म्हणून निखळ आनंद घेत वाचक या पुस्तकात गुंतून जातात. आज आपण सारेच अकारण गंभीर झालो आहोत. विनोद बुद्धी क्षीण होणे आणि हास्य लोपणे हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण मानले जाते. त्या दृष्टीने समाजाची वाटचाल सुरू असताना आणि आता कसदार विनोदी लेखन करणारे कोणीच दिसत नाही, असा तक्रारीचा सूर आळवला जात असताना सु.ल. खुटवड यांचा हा विनोदाचा ‘पंचरंगी’ खजिना दिलासा आणि आनंद देणारा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments