पुणे : महाराष्ट्रात अनादी काळापासून कीर्तन परंपरा आहे. कीर्तन परंपरेमुळे संतपरंपरा देखील टिकून राहिली आहे. मराठी प्रमाण भाषा कीर्तनात टिकवली जाते. शब्दांचे अर्थ सांगितले जातात. कीर्तन हे वैचारिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करणारे असते. असे मत संत साहित्याचे अभ्यासक डाॅ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे भारती कीर्तन महोत्सवाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७०४ वा प्रकट दिन, संत तुकाराम महाराज यांचा ३५४ वा बीज सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी योगीराज महाराज बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी, प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. डाॅ. सदानंद महाराज मोरे यांच्यासह ह.भ.प. डाॅ. भावार्थ महाराज देखणे, ह.भ.प. उल्हास महाराज सूर्यवंशी, ह.भ.प. सचिन महाराज पवार, ह.भ.प. भागवत महाराज साळुंखे, भारती विद्यापीठ सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डाॅ. म.शि. सगरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक शारंगधर साठे उपस्थित होते. महोत्सवात ह.भ.प.गणेश महाराज भगत आणि ह.भ.प.प्रमोद महाराज जगताप यांचे वारकरी कीर्तन झाले.
ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी, वारकरी संप्रदाय हा केवळ भक्तीप्रधान नसून, तो तत्त्वज्ञानावर आधारित एक ‘वर्धिष्णु’ संप्रदाय आहे. या संप्रदायाचा विस्तार होत असताना केवळ संख्यात्मक वाढ झाली आहे, परंतु गुणवत्तात्मक वृद्धीची कमतरता जाणवते. भारती विद्यापीठाच्या कीर्तनाच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून याचा सखोल अभ्यास होणार आहे. आजकाल अनेक ठिकाणी जे कीर्तन सादर केले जाते, त्याला खरेच कीर्तन म्हणावे का, असा प्रश्न निर्माण होतो. कारण कीर्तन हे उदरनिर्वाहाचे साधन नसून तो भक्तीचा मार्ग आहे. याच विचाराने विद्यार्थ्यांनी कीर्तनाचे शिक्षण घ्यावे.
मिलिंद जोशी म्हणाले, कीर्तनाने समाजाचे वैचारिक भरण पोषण केले आहे. कीर्तनकारांनी समाजाला ज्ञान देण्याचे कार्य केले. लाखो लोक कीर्तनातून प्रेरणा घेतात. कीर्तन ही एक कला आहे, पण त्याचे करिअर देखील होऊ शकते. कीर्तन शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवले पाहिजे यासाठी भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ने कीर्तन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले आहेत.
ह. भ. प. उल्हास महाराज सूर्यवंशी, ह. भ. प. सचिन महाराज पवार, ह. भ. प. भागवत महाराज साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.


