पुणे : विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टतर्फे, सुहृद मंडळ पुणे संचालित बधिर-मुक केंद्रातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मिलिंद भोई, सुहृद मंडळाचे संचालक मधुमिलिंद मेहंदळे, मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय फंड, कार्याध्यक्ष सुनील पांडे, तसेच वरुण हळंदे, गुणेश साने, योगेश जोगळेकर, चैतन्य रेड्डी, दिनेश अंबुरे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्याचे वाटप करण्यात आले.
आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी खास असते, एक असा गुण जो इतरांपेक्षा वेगळा असतो. त्या गुणांची ओळख करून, आपल्या आवडी जोपासायला हवी. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण गुण ओळखून शिक्षकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन द्यायला हवे.
डाॅ. मिलिंद भोई म्हणाले, सामान्य मुलांना शिकवतानाही शिक्षकांचा कस लागतो; मात्र बधिर व मूक विद्यार्थ्यांना शिकवणे हे अधिक कठीण आणि आव्हानात्मक असते. हे शिक्षक हे आव्हान लीलया पेलतात.
सुनील पांडे म्हणाले, विशेष मुलांसाठी काम करणे ही केवळ सेवा नसून एक सामाजिक जबाबदारी आहे. शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावता येतो, हीच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
दत्तात्रय फंड म्हणाले, मंडळाच्यावतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचा प्रयत्न मंडळाच्यावतीने केला जातो. शिक्षण घेत असताना कोणात्याही आर्थिक परिस्थिती अभावी त्यांचे शिक्षण थांबू नये तसचे कोणत्याही अडचणी येऊ नये म्हणून मंडळाच्यावतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो, असेही त्यांनी सांगितले.


