पुणे – डेटा सायन्स आणि पत्रकारिता अशा दोन क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्दिष्टार्थ फर्ग्युसन महाविद्यालयात डेटा जर्नालिझम या विषयावरील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम मुडे यांनी यासंदर्भातली माहिती दिली.
आगामी काळात डेटा सायन्सचे असणारे महत्त्व आणि माध्यम क्षेत्रांतील नवीन संधी या दोन्ही घटकांची पार्श्वभूमी या नव्या अभ्यासक्रमास आहे.डेटा सायन्स क्षेत्रातील कौशल्य व माध्यम क्षेत्रांत आवश्यक असलेली राजकीय व सामाजिक समज आशा दोन्ही घटकांवर या नव्या अभ्यासक्रमामध्ये भर दिला जाणार आहे. यामुळे डेटा सायन्स आणि मुख्यत्वे माध्यम क्षेत्रांत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी डेटा सायन्स आणि माध्यमे या दोन्ही क्षेत्रांत रोजगारक्षम असेल, असे मत या अभ्यासक्रमाचे संयोजक व माध्यम व संज्ञापन विभागाचे प्रमुख योगेश परळे यांनी यावेळी व्यक्त केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार रचना करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमास एकूण ४० क्रेडिट असून त्याचा कालावधी एक वर्षांचा आहे. जास्तीत जास्त अनुभवाधारित शिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि पुढील संधिंसाठी विभागातर्फे सहाय्य ही या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये असणार आहेत. हा पदव्युत्तर पदविका (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा) स्वरूपाचा अभ्यासक्रम असून कोणत्याही क्षेत्रांतील पदवीधर विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रवेश घेता येणार आहे.
या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे संकेतस्थळ पाहण्याचे आवाहन प्राचार्यांनी यावेळी केले.


