पुणे,25 ऑगस्ट 2025 : नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील डॉक्टरांच्या टीमने 65 वर्षीय महिलेवर रोबोटिक राईट मेन ब्राँकस स्लीव्ह रिसेक्शन शस्त्रक्रिया करत श्वसन मार्गात निर्माण झालेल्या कर्करोगग्रस्त ट्यूमर पासून मुक्तता मिळवून दिली.
नांदेड येथील ही महिला जेव्हा रूग्णालयात आली तेव्हा उच्चताप आणि न्युमोनियाची लक्षणे होती. नोबल हॉस्पिटल येथील इंटर्नल मेडिसिन विभाग प्रमुख डॉ.दानिश मेमन यांच्या सल्ल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील तपासणीसाठी चेस्ट फिजिशियन डॉ.आशिष धोत्रे यांनी ब्राँकोस्कोपी ही निदान प्रक्रिया केली,ज्यामध्ये श्वसनमार्गाच्या आवरणालगत ट्युमर असल्याचे आढळून आले.
याबाबत माहिती देताना वरिष्ठ कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.आशिष पोखरकर म्हणाले की, सामान्यत: अशा परिस्थितीत डीबल्कींग प्रक्रिया केली जाते. यामध्ये श्वसनमार्गातील अडथळा कमी करण्यासाठी ट्युमरचा काही भाग काढण्यात येतो आणि नंतर शस्त्रक्रिया केली जाते. मात्र या रूग्णाच्या बाबतीत खुली शस्त्रक्रिया किंवा थोरॅकोटॉमी ही वेदनादायक व जोखीमकारक ठरली असती.रूग्णावर सुरू असलेल्या अँटीबायोटिक व इतर उपचारांमुळे ही महिला स्थिर स्थावर होती आणि त्यामुळे आम्ही कमीत कमी छेद असलेली प्रक्रिया करायचे ठरवले.
वरिष्ठ कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.ललित बनस्वल यांनी या प्रक्रियेत साथ दिली. शरीरातील मुख्य श्वसनमार्ग हा पुढे जाऊन दोन भागांमध्ये विभाजित होतो आणि त्यापुढे त्याच्या अनेक भागात (फांद्या) विस्तार होतो. हा ट्युमर विस्तारीत होणाऱ्या डाव्या व उजव्या भागाच्या वरच्या बाजूला मुख्य मार्गात होता.
हा ट्युमर काढण्यासाठी रोबोटिक राईट मेन ब्राँकस स्लीव्ह रिसेक्शन शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले. या प्रक्रियेमध्ये छातीमध्ये तीन छोटी छिद्रे करण्यात आली एकातून कॅमेरा व दुसऱ्या दोन मधील रोबोटिक उपकरणे आतमध्ये टाकण्यात आली. रोबोटिक उपकरणांमुळे अगदी कमी जागेत अचूकतेने काम करत ट्युमर पर्यंत पोहचून तो काढण्यात यश मिळवले. हृदयामागचा हा भाग अत्यंत संवेदनशील असतो,कारण फुफ्फुसाकडे जाणारी वागस नस,अन्ननलिका आणि शरीरामध्ये महत्त्वाचे कार्य करणारे अवयव या भागात असतात.पारंपारिक प्रक्रियेमध्ये अशा भागात पोहचण्यासाठी वागस नस कापून टाकावी लागायची,मात्र यामुळे शस्त्रक्रियेनंतर न्युमोनियाची जोखीम बळावण्याची शक्यता असते.याबाबतीत कुठल्याही महत्त्वाच्या अवयवांना ईजा पोहचली नाही. श्वसन नलिकेच्या मुख्य भागातील बाधित भाग कापून टाकणे व जोडणे ही अतिशय आव्हानात्मक बाब असते.मात्र रोबोटिक उपकरणांमुळे हे अचूकतेने करता आले.याशिवाय प्रक्रियेदरम्यान एक फुफ्फुस बंद करून (कोलॅप्स) अधिक जागा केली जाते.यामुळेच भूलतज्ञांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते.
अशा गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये रूग्णाच्या श्वसनमार्गातील वायुविजन (व्हेंटीलेशन), एका फुफ्फुसात हवा खेळती ठेवणे तर प्रक्रियेला जागा करून देण्यासाठी दुसरे फुफ्फुस कोलॅप्स करणे आणि प्रक्रियेदरम्यान रूग्णाला स्थिर ठेवणे हे अत्यंत आव्हानात्मक असते,असे नोबल हॉस्पिटलमधील भूलतज्ञ डॉ.पल्लवी बुतयानी यांनी सांगितले.
ही शस्त्रक्रिया एसएसआय मंत्रा 3.0 रोबोट याने करण्यात आली आणि या उपकरणाद्वारा आम्हाला ट्युमर काढण्यात तसेच लसिका ग्रंथींमधील (लिम्फ नोडस) सुक्ष्म कर्करोग पेशी देखील काढण्यात यश मिळाले.डॉ.आशिष पोखरकर म्हणाले की, कर्करोग दोन प्रकारचे असतात,एक टिपिकल व एक अटिपिकल कार्सिनॉईड. याबाबतीत हा कर्करोग टिपिकल प्रकारचा होता,जे कमी आक्रमक आणि तुलनेने हळू वाढणारे असतात.याबाबतीत लसिका ग्रंथींपर्यंत हा कर्करोग पसरला होता.रूग्ण तुलनेने तंदुरूस्त असल्याने अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय आम्ही घेतला. श्वसन नलिकेतील ट्युमर हा 2 सेमी बाय 2 सेमीचा होता.असा कर्करोग का उद्भवतो ,याचे नक्की कारण माहित नाही. शस्त्रक्रिया झाल्यावर कर्करोग तज्ञ डॉ.निखील शिर्शी यांचा सल्ला घेण्यात आला.त्यांच्या मताप्रमाणे ट्युमर चांगल्या प्रकारे काढण्यात यश मिळाल्याने केमोथेरपीची सध्या गरज नाही.ही महिला एका आठवड्यात घरी जाऊ शकली.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,हे यश अशा प्रकारची स्थिती रोज हाताळणाऱ्या डॉक्टर व टीमचे कौशल्य आणि अद्ययावत तंत्रज्ञान यामुळे शक्य झाले. डिसेंबरमध्ये एसएसआय मंत्रा 3.0 रोबोट प्रस्थापित केल्यापासून 40 हून अधिक रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत.यामुळे अधिक अचूकता,कमी रक्तस्त्राव ,रूग्ण तुलनेने लवकर बरे होणे आणि रूग्णालयात कमी वास्तव्य श
क्य झाले आहे.


