पुणे, दि. 3: ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025’ च्या निकालाची गुणयादी व गुणपत्रक उमेदवारांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर पुन:श्च उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये 27 मे ते 5 जून 2025 या कालावधीत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 2 लाख 28 हजार 808 उमेदवारांपैकी 2 लाख 11 हजार 308 उमेदवार परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेचा निकाल 18 ऑगस्ट 2025 रोजी तर राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी. एल. एड. परीक्षेतील 6 हजार 320 उमेदवारांपैकी 2 हजार 789 उमेदवारांचा निकाल 28 ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.


