३७ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे सुवर्णक्षणांची सांगीतिक पर्वणी रंगली. ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा, संगीतकार श्रीनिवास खळे, मदन मोहन, ओ.पी. नय्यर, सलिल चौधरी तसेच ज्येष्ठ नाट्यगायिका जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या अविस्मरणीय गाण्यांना स्वरांजली अर्पण करणारा “सोनेरी-चंदेरी सांगीतिक मैफल” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या मैफलीत प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल, गायक संजिव मेहेंदळे, मंदार आपटे आणि सहकारी कलाकारांनी सुरेल सादरीकरण केले. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गाजलेल्या गाण्यांनी रसिकांना तृप्त केले. “अमृताहूनी गोड नाम तुझे देवा”, “कौसल्येचा राम”, “अंगणी पारिजात फुलला”, “शुक्रतारा”, “लग जा गले”, “सुहाना सफर और ये”, “ऐ दिल है मुश्किल” यांसारख्या रचना ऐकून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
मराठीतील “राजस सुकुमार”, “बगळ्यांची माळ”, “वद जाऊ कुणाला शरण” यांसारखी गाणी तसेच हिंदीतील “मांगके साथ तुम्हारा”, “आपके हसीन रुख पे”, “रंग और नूर की”, “जानेमन जानेमन” अशा अनेक गाण्यांनी रसिकांना जुने सुवर्णयुग पुन्हा अनुभवता आले.
वादकांच्या ताल-सुरांच्या संगतीने कार्यक्रम अधिक खुलला. ओंकार पाटणकर (सिंथेसायझर), तुषार दिक्षित (सिंथेसायझर), अमित कुंटे (तबला), रूतुराज कोरे (ऑक्टोपॅड) आणि मोहनिश निश्चल (गिटार) यांच्या वादनाने गायनाला अप्रतिम साथ लाभली. सोनाली श्रीखंडे यांनी निवेदन केले.
ही मैफल पुणेकर रसिकांसाठी एक संस्मरणीय संगीतसोहळा ठरली. दिग्गज कलाकारांच्या सुमधुर रचनांना नव्या आवाजातून अर्पण केलेल्या स्वरांजलीने प्रेक्षकांना रसिकतेचा अविस्मरणीय अनुभव दिला. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, मोहन टिल्लू यांच्या हस्ते कलावंतांचे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काका धर्मावत, अतुल गोंजारी, श्रीकांत कांबळे आदी उपस्थित होते.


