पुणे,5 सप्टेंबर २०२५ : 40 व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा निमित्ताने पीबीएमएच्या एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल नेत्रपेढी तर्फे नेत्रदानाच्या प्रसारासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवानिमित्त अनेक भाविक गणपती मंडळांना दर्शनासाठी भेटी देतात. नेत्रपेढी तर्फे पुण्यामधील प्रमुख गणपती मंडळांना भेटी देऊन नेत्रदान जागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक गणेश मंडळांमध्ये संपूर्ण टीम ने आलेल्या भाविकांना नेत्रदान विषयी माहिती दिली आणि नेत्रदान प्रतिज्ञा पत्र भरून घेतले. याबरोबरच नेत्रदान जागृतीचे पोस्टर्स आणि माहितीपत्रके देण्यात आली. तसेच नेत्रदानाविषयी लोकांच्या विविध शंकांचे निरसन व त्याविषयी असेलेले गैरसमज दूर करून, पीबीएमएच्या एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल मधील सेवा आणि नेत्र पेढीबद्दल माहिती देण्यात आली.
यावेळी विभागप्रमुख आणि नेत्रपेढी अधीक्षक डॉ. शिल्पा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली,नेत्रतज्ज्ञ डॉ.स्नेहल घाडगे,नेत्र पेढीचे उपव्यवस्थापक सतीश कुरपड,नेत्रदान समुपदेशक उर्मिला प्रभुणे,सुशांत यादव,मनीषा पांढरे,नकुल कुलकर्णी, नेत्र पेढी चे सर्व सहकारी, कॉर्निया विभागातील मधील सर्व कन्सल्टन्ट, तंत्रज्ञ आणि इतर सहकारी ह्या प्रभात फेरी मध्ये सामील झाले.
ह्या प्रभात फेरीची सुरुवात पुण्यातील ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिरा पासून करण्यात आली. त्यानंतर पुढे भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, तांबडी जोगेशवरी गणपती मंडळ, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर पर्यत नेत्रदानाबद्दल माहिती पत्रकांचे वाटप करून आणि घोषणा देत नेत्रदानाचा प्रचार करण्यात आला. प्रत्येक गणेश मंडळांमध्ये संपूर्ण टीमचे उत्साहात स्वागत करण्यात आले
.


