Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorized६ व ७ ऑक्टोबर रोजी पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सवाचे आयोजन...

६ व ७ ऑक्टोबर रोजी पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सवाचे आयोजन गांधर्व महाविद्यालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आयोजन

 

पुणे, दि. १ ऑक्टोबर, २०२५ : १९०१ साली स्थापन झालेले गांधर्व महाविद्यालय यावर्षी आपले शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांस्कृतिक समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवार दि. ६ ऑक्टोबर आणि मंगळवार दि. ७ ऑक्टोबर रोजी पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही दिवशी सायं. ५ ते रात्री ९ दरम्यान टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल येथील गणेश सभागृह या ठिकाणी सदर महोत्सव संपन्न होईल. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.

 

महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी म्हणाले, “पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांना भारतीय संगीत क्षेत्रातील क्रांतीकारक मानले जाते. पाठ्यपुस्तके, नियमित वर्ग, नियमित वेळेत शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी पं. पलुस्कर यांनी ५ मे, १९०१ साली लाहोरमध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची स्थापना केली. त्याकाळी भविष्याचा विचार करीत स्थापन झालेले गांधर्व महाविद्यालय आजही शास्त्रीय संगीत क्षेत्रात महत्त्वाचे काम करीत असून यावर्षी संस्था आपले शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सादर करीत आहे. संपूर्ण वर्षभरात (२०२५-२०२६) संस्थेच्या माध्यमातून अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ६ व ७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सव याचाच एक भाग आहे.”

 

६ ऑक्टोबर रोजी सायं ५ वाजता पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन संपन्न होईल. यानंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण होईल. त्यानंतर पुण्याच्या गायिका गायत्री गोखले यांचे गायन होईल. धारवाडचे प्रसिद्ध सतारवादक मोहसीन खान यांच्या सतारवादनाचा अनुभव उपस्थितांना घेता येईल. गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांच्या शिष्या असलेल्या यशस्वी सरपोतदार यांच्या गायनाने महोत्सवाच्या पहिला दिवसाचा समारोप होईल.

 

यानंतर ७ ऑक्टोबर रोजी सायं ५ वाजता अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण होईल. त्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध संतूरवादक आणि पं. धनंजय दैठणकर यांचे पुत्र व शिष्य निनाद दैठणकर यांचे संतूरवादन रंगेल. विदुषी डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य असलेल्या अतुल खांडेकर यांच्या गायनाची अनुभूती यावेळी रसिकांना अनुभविता येईल. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा व महोत्सवाचा समारोप पं. योगेश समसी यांचे मुंबईस्थित शिष्य प्रसिद्ध तबलावादक यशवंत वैष्णव यांच्या तबलावादनाने होईल. महोत्सवाच्या दोन्ही दिवशी लीलाधर चक्रदेव, निलय साळवी, अदिती गराडे हे संवादिनीसाथ करतील तर पांडूरंग पवार, किशोर कोरडे, तेजस माजगांवकर, हेमंत जोशी, पुष्कर महाजन हे तबलासाथ करतील अशी माहितीही अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे सचिव पं. सुधाकर चव्हाण यांनी कळविली आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments