पुणे, ७ ऑक्टोबर २०२५ :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (एनएमआयएएल) उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेले उद्घाटन केवळ मुंबईकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. या विमानतळामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सातारा, सोलापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र विभागाला नव्या आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीच्या, रोजगाराच्या आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील, असे केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
मोहोळ म्हणाले, “नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (एनएमआयएएल) ही महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची रचना, विकास, बांधकाम, कामकाज, देखभाल, व्यवस्थापन व विस्तार आदी कामांसाठी स्थापन करण्यात आलेली कंपनी (स्पेशल पर्पज व्हेइकल) आहे. हा संपूर्ण विमानतळाचा प्रकल्प मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि सिडको यांच्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारीतील (पीपीपी) उभारण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पाहिलेल्या विकसित भारत २०४७ या उद्दिष्टपूर्तीसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्यवेधी व्हिजनमुळे विमानतळाचे काम पूर्णत्वास आले असून, त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला विविध क्षेत्रात होणार आहे.पुणेकरांना या विमानतळामुळे दुहेरी लाभ मिळणार आहेत. मुंबई विमानतळावरील गर्दीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या स्लॉट्स मर्यादित आहेत, त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळामुळे अधिक आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सची उपलब्धता वाढेल. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती परिसरातील उद्योगांना निर्यातीसाठी जवळचे आणि आधुनिक मालवाहतूक केंद्र मिळेल.”
विमानतळावर उभारण्यात आलेले अत्याधुनिक मालवाहतूक टर्मिनल वर्षाला सुमारे ३.२ दशलक्ष मेट्रिक टन माल हाताळण्यास सक्षम आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा आणि एग्री-प्रोसेसिंग उद्योगांना निर्यात सुलभ होईल, असे मोहोळ यांनी सांगितले.
नवी मुंबई विमानतळ ठाणे, भिवंडी आणि जेएनपीटी बंदराच्या जवळ असल्यामुळे मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमार्गे पुण्याहून थेट २.५ ते ३ तासांत पोहोचता येईल. यामुळे हवाई मालवाहतुकीचा कालावधी कमी होईल आणि निर्यात खर्चात घट होईल.
मोहोळ यांनी सांगितले की, “मुंबईच्या विस्ताराची नैसर्गिक दिशा आता पुण्याकडे येत आहे. या विमानतळामुळे पुणे-मुंबई महानगर प्रदेशात नव्या औद्योगिक कॉरिडॉरचा विकास वेगाने होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात प्रगत आणि शाश्वत विमानतळ म्हणून उभारण्यात आला आहे. ४७ मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती, पावसाचे पाणी साठवण, आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर या सुविधांमुळे तो खऱ्या अर्थाने ‘ग्रीन एअरपोर्ट’ ठरणार आहे.”
मोहोळ यांनी नमूद केले की, “हा प्रकल्प महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. पुणेकरांसाठी हे पर्यावरणासह विकासाचे आदर्श उदाहरण ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील हवाई प्रवास सामान्य नागरिकांसाठी सुलभ करण्याचा ‘उडान’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरवला आहे. नवी मुंबई विमानतळ हे त्याच दृष्टीकोनाचे पुढचे पाऊल आहे. हा केवळ विमानतळ नाही, तर भारताच्या नव्या आर्थिक क्षितिजाचा प्रवेशद्वार आहे.”
…
चौकट
…
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील लोकांसाठी हा विमानतळ म्हणजे ‘ग्लोबल गेटवे टू ग्रोथ’ असल्याचे मोहोळ म्हणाले.
“पुण्याच्या उद्योगांना, पर्यटन क्षेत्राला आणि नागरिकांना या विमानतळामुळे जागतिक स्तरावर पोहोचण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टीने महाराष्ट्र नव्या विकासाच्या उंचीवर पोहोचेल,” असे त्यांनी नमूद केले.
…..
चौकट
…..
तळेगाव आणि चाकण परिसरात अनेक बहुराष्ट्रीय उत्पादक कंपन्या ; तसेच वाहन उद्योग आहेत. त्याचप्रमाणे हिंजवडी, मारुंजी परिसरात नामांकित आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. या सर्व कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना विमानतळाचा फायदा होणार आहे. या विमानतळामुळे पिंपरी चिंचवडमधील पुनावळे, किवळे, गहुंजे परिसराला महत्त्व प्राप्त होणार आहे.