पुणे: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी माता मंदिराची सजावट करण्याचा मान यंदाही सलग दहाव्या वर्षी पुण्यातील आर. आर. किराड उद्योग समूहाला मिळाला आहे. मागील दशकभरापासून या समूहाने श्रद्धा, परंपरा आणि सौंदर्य यांचा संगम साधत मंदिराच्या सजावटील आपले मोलाचे योगदान दिले आहे.
यंदाची आरास विशेष ठरली असून, प्रथमच फुलांच्या सजावटीसोबत देवीला अर्पण होणारे पारंपरिक दागिने आणि पूजावस्तू यांचाही समावेश करण्यात आला होता. यामध्ये कवडीच्या माळा, नथ, बांगड्या, कुंकू, खण-चोळी, नारळ, जोडवी आणि इतर पूजात्मक अलंकारांचा समावेश होता. फुलांच्या सुवासासह पारंपरिक दागिन्यांची ही जोड मिळाल्याने गाभारा, मुख्य मंडप व प्रवेशद्वार परिसर भक्तिमय आणि दैवी प्रकाशाने उजळून निघाला.
या आरासेला यंदा ‘जगत्त्वं जगदाश्रया महादेवीश्वरूपिणी’ हा विशेष भावार्थ दिला आहे. महाराष्ट्रातील अलीकडील पूरस्थिती व निसर्गजन्य संकटांच्या पार्श्वभूमीवर देवीपाशी शांती, संरक्षण आणि पुनर्बांधणीची प्रार्थना या संदेशातून करण्यात आली आहे. सरपाले फ्लॉवर मर्चंट च्या कारागिरांनी ही फुलांची सजावट साकारली.
आर. आर. किराड समूहाचे व्यवस्थापकीय संचालक नरेश किराड म्हणाले, तुळजाभवानीच्या दर्शनातून आम्हाला ऊर्जा, आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळते. सलग दहाव्या वर्षी सजावट करण्याची संधी मिळणे हा आमच्यासाठी परम सन्मान आहे. यंदाची सेवा आम्ही पूरग्रस्त महाराष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित करीत आहोत.