यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आयोजित रक्तदान शिबिरात ७५ जणांचे रक्तदान

तारां कित Avatar

पिंपरी, दि. ८ ऑक्टोबर २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अविनाश युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने चिंचवडेनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ७५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

 

चिंचवडे नगर येथील कै. अविनाश उत्तमराव चव्हाण यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका करुणा चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, दत्तात्रय चिंचवडे उपस्थित होते.

 

उद्घाटनप्रसंगी बोलताना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले की, “समाजातील वाढत्या रक्ताच्या गरजेला ओळखून, महापालिका आणि अविनाश युवा प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. वैद्यकीय विभागाच्या वतीने समाजातील नागरिकांनी अशा प्रकारच्या आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, रक्तदानाचे महत्त्व समजून घेऊन अधिकाधिक जनजागृती घडवावी,” असे त्यांनी आवाहन केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्राचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. गणेश लांडे, समाजसेवा अधीक्षक किशन गायकवाड आणि संपूर्ण कर्मचारीवर्ग यांनी परिश्रम घेतले. तसेच अविनाश युवा प्रतिष्ठानचे अतुल चव्हाण, प्रशांत चिंचवडे, सागर वाघमारे, भरत यादव, बाळा कोरडे, पुष्कर मोहिते, हेमंत भोर, सौरभ पोकळे यांनीही विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ चिंचवडे यांनी केले.

 

 

Tagged in :

तारां कित Avatar