पुणे, दि. ११ ऑक्टोबर, २०२५ : नव्याने विकसित होत असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या साह्याने नव्या पिढीला इतिहास शिकवणे शक्य असून त्याचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचे मत राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे अशा अत्याधुनिक पद्धतीने आज आंबेगाव बुद्रुक येथे निर्माणाधीन असलेल्या शिवसृष्टीमध्ये हा इतिहास पाहणे पुणे आणि परिसरातील नागरिकांना सहज साध्य होत असल्याचेही मिसाळ यांनी सांगितले.
शिवसृष्टी प्रकल्पाअंतर्गत पुणे महानगरपालिका आणि भारतीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या सहकार्यातून मुंबई- बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ उभारण्यात आलेल्या शिवकालीन समूह शिल्पाचा लोकार्पण समारंभ आज मिसाळ त्यांच्या हस्ते झाला. यावेळी खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, गारवे ग्रुपचे संचालक किशोर गारवे, शिवसृष्टीचे अध्यक्ष जगदीश कदम, विश्वस्त विनीत कुबेर, सुनील मुतालिक, अमृत पुरंदरे, सल्लागार मनोज पोचट, प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते.
आज लोकार्पण करण्यात आलेले शिवकालीन समूह शिल्प हे १५ फूट लांब, १५ फूट रुंद आणि तब्बल २५ फूट उंच असून याद्वारे सतराव्या शतकातील युद्धभूमीचे जिवंत चित्र बघणाऱ्याच्या समोर उभे राहते. पायथ्याशी घोडदळ, माथ्यावर झेंडा रोवणारा मावळा, हातात तलवार, ढाल, भाला घेतलेले योद्धे या समूह चित्रात दाखविण्यात आले आहेत. प्रत्येक शिल्पातील हालचाल, मुद्राभाव आणि घोड्यांच्या चैतन्यपूर्ण आकृती हे या समूह शिल्पाचे वैशिष्ट्य असून शिल्पकार दीपक थोपटे यांनी हे शिल्प साकारले आहे. आज लोकार्पनानंतर थोपटे यांचा देखील सत्कार करण्यात आला. या समूह शिल्पासाठी गारवे समूहाचे किशोर गारवे व विनायक गारवे यांनी आर्थिक सहाय्य केले असून आज किशोर गारवे यांचाही सन्मान शिवसृष्टीच्या वतीने करण्यात आला.
सध्या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात बदल होत असून एआय, व्हर्चुअल रियल्टी असे अनेक प्रकार विकसित होत आहेत. तरुण मंडळींचा या तंत्रज्ञानाकडे ओढा आहे, त्यामुळे त्याचा वापर केला तर आपण त्यामधून नव्या पिढीला चांगल्या प्रकारे इतिहास शिकवू शकतो, असे मिसाळ यावेळी म्हणाल्या.
आपल्या इतिहासाच्या रक्षणासोबतच संवर्धन राज्य सरकारने किल्ल्यांवर पुनर्बांधणी, प्रकाश योजना, माहिती फलक आणि पायाभूत सुविधा यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असून त्यामध्ये स्थानिक लोकसहभागही महत्त्वाचा भाग असणार आहे. मराठी अस्मिता व जागतिक वारसा यामधला दुवा साधण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. युनेस्कोच्या मानांकनातून छत्रपती शिवाजी महाराजांना जागतिक नकाशावरील स्थान अधिक ठळक होण्यास मदत होणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.
नवीन पिढीला शिवाजी महाराजांचे चरित्र अत्यंत प्रभावीपणे सांगण्यासाठी शिवसृष्टी उपयुक्त ठरणार आहे. या ठिकाणी गड, किल्ले, वास्तुशिप, युद्धदृश्ये, दृश्यशैली मांडताना थ्री डी, फोर डी मॉडेल शो, व्हिज्युअलायझेशन अशा नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचे मिसाळ म्हणाल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले राजे होते, त्यामुळे तरुणांनी त्यांनी केलेल्या कार्याचा अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टीला एकदा तरी भेट द्यावी, असे आमदार भीमराव तापकीर यावेळी म्हणाले.
पुढील दोन वर्षांमध्ये शिवसृष्टीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्याचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून रायगडची राजसभा आणि शिवराज्याभिषेक सोहळा उभे करण्याचे नियोजन सध्या सुरु असल्याचे जगदीश कदम यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अजित आपटे यांनी केले. विनीत कुबेर यांनी आभार मानले.