पुणे, दि. १२ : पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय औंध, पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय औंध येथे करण्यात आला.
यावेळी विविध विभागाचे वैद्यकीय अधिकारी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
श्री. पाटील यावेळी म्हणाले, आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजणे ही आदर्श आणि जबाबदार पालक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. या मोहिमेत एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याकरिता आरोग्य विभाग दक्षता घेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांचे पल्स पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व ० ते ५ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील ५ लाख ६ हजार ८०७ जिल्हा रुग्णालय औंध, सांगवी भागातील तसेच पुणे महानगर पालिका शहरी भागातील ६९ हजार ६९० एकूण लाभार्थी ५ लाख ७६ हजार ४९७ बालकांचे पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे.
जितेंद्र डूडी,जिल्हाधिकारी: भारत देश पोलिओ मुक्त झाला असला तरीही जगातील काही भागात अजूनही पोलिओचा धोका कायम आहे त्यामुळे आपल्या मुलांचे पोलिओपासून संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
डॉ. भगवान पवार,उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ: पोलिओवर मात करण्यासाठी प्रत्येक घर, प्रत्येक मुलापर्यंत पोहोचलेच पाहिजे. आपल्या एका दुर्लक्षामुळे एखाद्या बालकाचे भविष्य अंधारमय होऊ शकते. आपण सर्वांनी मिळून ही मोहीम यशस्वी करूया आणि आपला जिल्हा पोलिओमुक्त ठेवूया.
डॉ. रामचंद्र हंकारे जिल्हा आरोग्य अधिकारी: ‘पोलिओमुक्त भारत’ या उद्दिष्टासाठी सर्व शहरी व ग्रामीण भागात मिळून एकूण ४ हजार २२३ पोलिओ लसीकरण केंद्र (बूथ) आणि याकरिता आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका असे एकूण १० हजार ३१८ कर्मचारी तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच वीटभट्टी,उसतोड कामगार, तात्पुरते स्थलांतरित लोक, लेबर कॅम्प, आदी ठिकाणच्या ० ते ५ वर्ष बालकांना मोहिमेच्या आदल्या दिवशी पोलिओचे डोस देण्यात आलेले आहेत.
0000