मान्सून हे बहुसांस्कृतिकता आणि एकसंधतेचे महत्त्वाचे कारण; ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांचे प्रतिपादन

तारां कित Avatar

ज्येष्ठ पत्रकार, लेखक सुनील तांबे लिखित ‘मान्सून- जन, गण, मन’ पुस्तकाचे झाले प्रकाशन

 

दि. १३ ऑक्टोबर २०२५ : दक्षिण आशिया व भारतीय उपखंडाचा जीवनाधार असणारा मान्सून, ही केवळ भौगोलिक घटना नाही. उपखंडाच्या बहुविध सांस्कृतिकतेचे आणि एकसंधतेचे मान्सून हे महत्त्वाचे कारण आहे. ही भूमिका मांडणारे विचारप्रवर्तक पुस्तक, अशा शब्दांत ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक किशोर बेडकिहाळ यांनी सुनील तांबे लिखित ‘मान्सून – जन, गण, मन’ या पुस्तकाचा गौरव केला.

 

राष्ट्र सेवा दल आणि मनोविकास प्रकाशन आयोजित, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक सुनील तांबे लिखित ‘मान्सून – जन,गण, मन’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. याप्रसंगी लेखक सुनील तांबे, प्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे, हिंद मजदूर किसान पंचायत – महाराष्ट्रचे अध्यक्ष कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर, कवी– अभिनेते किशोर कदम आणि मनोविकास प्रकाशनाचे संचालक आशिश पाटकर व्यासपीठावर उपस्थित होते. सिंहगड रस्त्यावरील, साने गुरुजी स्मारक, राष्ट्र सेवा दलाच्या नाथ पै सभागृहात सदर प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

 

बेडकिहाळ यांनी मान्सून या एकाच घटकाचा उपखंडातील आर्थिक, राजकीय, सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक घटकांवर कसा आणि किती प्रभाव पडला आहे, याचे सविस्तर विवेचन केले. “मान्सूनने उपखंडात सहजीवन निर्माण केले. मध्य आशियापर्यंत सर्वत्र पोचणारे व्यापारी काफिले घेऊन मान्सूनच्या सुरवातीला उपखंडात येत आणि परतीच्या मान्सूनसोबत परत जात असत. हा व्यापार खुष्कीच्या तसेच समुद्रमार्गाने होत असे. यामध्ये हिंदू, मुस्लिम, गुजराती, सिंधी, इराणी, अरबी…असे विविध धर्म, पंथ, भाषा, वंश आणि जातींचे लोक होते. पण समाज म्हणून त्यांच्यात एकसंधता होती. आर्थिक, सामाजिक, सामरिक, सुरक्षेच्या मुद्यांनी त्यांना एकमेकांसोबत पिढ्यानपिढ्या बांधून ठेवले होते. उपखंडासह आधीच्या हिंदुस्थानात अनेक राजसत्ता होत्या, पण करभरणा हा मुद्दा वगळल्यास येथील गावगाडा स्थिर होता. अबाधित होता. देशाची एकसंधता, बहुसांस्कृतिकता यातून निर्माण झाली होती आणि टिकली होती. मात्र, इंग्रजांनी हे बलस्थान हेरले आणि यावरच घाव घातला. उपखंडाच्या सामाजिक स्थैर्यावर आघात केला. येथील सामाजिक एकसंधतेमध्ये फुटीरतेची बीजे रोवून, संघर्षात्मक स्वरूप निर्माण केले. मान्सून हा एकसंधतेचा आधार तुटला. भारतीय ही ओळख नष्ट करून विशिष्ट धर्म, जात, पंथ यावर आधारित ओळखी लादल्या आणि नवे संघर्ष तयार केले. लेखक सुनील तांबे यांनी मान्सून या ऋतूच्या माध्यमातून उपखंडातील या संघर्षाचे सूचन उत्तम पद्धतीने मांडले आहे”, असे बेडकिहाळ म्हणाले.

 

आसाराम लोमटे म्हणाले, “मान्सून हा जिव्हाळ्याचा घटक आहे. हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी भाषेतही यावे. त्यामुळे मान्सूनचे हे जागरण भारतीय पातळीवर पोचेल. मान्सून या घटकाने आपली बहुसांस्कृतिक परंपरा सामावून घेतली आहे. मान्सूनचे हे सामाजिक, कृषीनिगडीत, राजकीय आर्थिक, सांस्कृतिक संदर्भ लेखकाने इथे उलगडले आहेत. मान्सूनचा परिणाम भूप्रदेश, कृषी, पशुपालन, खाद्यसवयी, व्यापार, प्रवास अनेक घटकांवर होत असतो. मान्सूनच्या शास्त्रीय – वैज्ञानिक – भौगोलिक मांडणीसोबतच मान्सूनची सांस्कृतिक अंगाने त्यांनी केलेली मांडणी महत्त्वाची आहे. लोकपरंपरा, लोकसाहित्याचे अनेक संदर्भ त्यांनी दिले आहेत. पुस्तकाच्य २२ प्रकरणांतून वस्तुनिष्ठ माहिती तर आहेच, मान्सूनकडे जनसामान्य कसे पाहतात, याचाही वेध त्यांनी घेतला आहे.” अजित शिंदे यांनी लेखकाचे संशोधन, भ्रमंती, समाजोपयोगी दृष्टी आणि अभ्यासपूर्ण मांडणी, यातून उत्तम आशय निर्माण केल्याचे मत मांडले.

 

प्रकाशकीय मनोगत मांडताना आशिश पाटकर म्हणाले, “मनोविकास प्रकाशन ४० वर्षांपासून कार्यरत आहे. २ हजारपेक्षा अधिक टायटल्सची निर्मिती आम्ही केली आहे. उत्तम लेखकांमुळेच ही वाटचाल शक्य झाली. वैज्ञानिक, विचारनिष्ठ, समाजोपयोगी अशा लेखनाच्या प्रकाशनासाठी आम्ही पुढाकार घेत आलो आहोत. सुनील तांबे यांच्या या पुस्तकाची आवृत्ती प्रकाशनापूर्वीच संपली आहे”, असेही ते म्हणाले.

 

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी लेखक सुनील तांबे यांच्याशी संवाद साधला. लेखक तांबे म्हणाले, “पुस्तकाच्या निमित्ताने वार्ताहर, अनुवादक, संपादक, पर्यटक, अभ्यासक, संशोधक अशा विविध भूमिकांमधून मी वावरलो. रायटर्स संस्थेत कार्यरत असताना, हा विषय पेरला गेला. दरवर्षीचा मान्सून वेगळा असतो. प्रत्येक प्रांतातला मान्सून निराळा असतो, हे मी प्रत्यक्ष अनुभवले. देशात मान्सूनचे ३६ उपविभाग आहेत. मान्सूनचा अर्थ दिशा बदलणारे वारे, इतकाच आहे, पण त्यापलीकडे मान्सूनची व्याप्ती महाप्रचंड आहे. मान्सूनने आपले सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक जीवन प्रभावित केले आहे. अभ्यास, संशोधनातून हे जसे पुढे येत गेले, तसा मान्सूनचा विषय पुढे जात राहिला आणि आता तो पुस्तकरूपाने वाचकांसमोर येत आहे.” कपिल पाटील यांनी परिचय करून दिला. राजा कांदळकर यांनी

आभार मानले.

Tagged in :

तारां कित Avatar